- रायगडातील दुकानदार संभ्रमात
- प्रशासनाने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी
अलिबाग ः प्रतिनिधी
एकीकडे वाढते लॉकडाऊन दुकानदारांना असह्य झाले असताना आठ दिवसांपूर्वी जी दुकाने पूर्ण वेळ सुरू होती त्या दुकानांचे शटरही दुपारी 2नंतर खाली ओढावे लागत आहे. अशात नव्याने काढलेल्या सुधारित आदेशानुसार दुकाने उघडण्याचा प्रयत्न केला असता स्थानिक प्रशासकीय कर्मचारी आपल्याकडे सुधारित आदेश नसल्याचे सांगत दुकाने बंद करण्याची भूमिका घेत आहेत. परिणामी दुकानदार आजही संभ्रमात असल्याचे दिसते.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून गेल्या एप्रिलपासून लॉकडाऊन सुरू झाले. अत्यावश्यक सेवेत समाविष्ट होणारी किराणा मालाची दुकाने, दूध डेअरी, मेडिकलची दुकाने व इतरांना परवानगी मिळाली, मात्र कपडा बाजार, सराफ पेढी आणि अन्य व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले गेले. दरम्यान, 15 ते 17 मे रोजी झालेल्या चक्रीवादळानंतर लोकांचे जे नुकसान झाले ते पाहून किराणा मालाची दुकाने व इतर आवश्यक दुकानांना पूर्ण वेळ परवानगी देण्यात आली.
31 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर झाले. सामान्य जनतेने आणि दुकानदारांनीदेखील या लॉकडाऊनची मानसिकता केली, पण त्यानंतर पुन्हा 15 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढल्याने सामान्य नागरिक विशेषतः व्यापारीवर्ग नाराज झाला आहे. आधीच दोन ते तीन महिने या टाळेबंदीमुळे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. त्यात पावसाळा तोंडावर आल्याने हे वाढते लॉकडाऊन आर्थिक कंबरडे मोडणारे ठरत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
दरम्यान, नव्याने वाढविण्यात आलेल्या 15 जूनपर्यंतच्या लॉकडाऊनबाबत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी अध्यादेश काढले. त्यानंतर सुधारित आदेश काढले गेले. त्यामध्ये दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उघडी राहतील, असा उल्लेख असल्याचे दुकानदार दाखवत आहेत. अलिबागसह अन्य ठिकाणी दुकाने बुधवारी (दि. 2) सकाळी उघडण्यात आली, पण स्थानिक प्रशासनाने आपल्याकडे सुधारित आदेश नसल्याचे सांगून दुकाने बंद करण्यास सांगितले. पोलिसांनीदेखील ही दुकाने बंद करण्यास सांगितल्याने दुकानदारांना काय करावे तेच कळले नाही. कर्जतमध्ये तर पोलिसांनी कारवाई सुरू केल्याने व्यापार्यांना पोलीस ठाणे गाठावे लागले.
बर्याच वेळा शासकीय भाषा सामान्य जनतेला कळत नाही. त्यामुळे या आदेशाचेदेखील तेच झाले आहे. दुकानदार संभ्रमात आहेत. ही संभ्रमावस्था जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दूर करावी, अशी अपेक्षा दुकानदार व्यक्त करीत आहेत.