नवी मुंबई : प्रतिनिधी
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे. यासाठी 10 जून रोजी होणार्या मानवी साखळी इशारा आंदोलनासाठी गावोगावी बैठका सुरू आहेत. त्याप्रमाणे जुईनगर, सारसोळे, नेरूळ या ठिकाणी ग्रामस्थांच्या बैठका झाल्या. या बैठकांना उत्स्फूर्तपणे विविध पक्ष, संघटना, मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होत असून ठिकठिकाणी ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या सभांना मार्गदर्शन करतांना नवी मुंबई समन्वयक डॉ. राजेश पाटील, दीपक ह. पाटील, साईनाथ पाटील, अविनाश सुतार, सुनील पाटील, नगरसेवक सुरज पाटील, गिरीश म्हात्रे यांनी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांचे नेतृत्व नवी मुंबईतच नाही तर महाराष्ट्रातील सर्वमान्य नेतृत्व होते असे सांगितले. लोकनेते दि. बा. पाटील यांनी शेतकरी, कष्टकर्यांसाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले. सर्वस्व त्याग करून वेळप्रसंगी रक्तरंजित क्रांती घडवली आणि आयुष्यभर केलेल्या संघर्षातून जनतेला न्याय मिळवून दिला आहे. अशा निस्वार्थी, त्यागी, नेत्याचे नाव त्यांची कर्मभूमी असलेल्या नवी मुंबईत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळास देण्यात यावे, असे एकमुखी सभा आणि बैठकीत ठरले आहे, अशी माहिती माहिती समन्वयक डॉ. राजेश पाटील यांनी दिली.