पनवेल : रामप्रहर वृत्त
सातत्याने समाजसेवाचा ओढा घेतलेले सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर जोशी यांनी त्यांच्या मुलाच्या स्मरणार्थ ओवे पेठ येथील शाळेची दुरुस्ती करून एका चांगला पायंडा पाडला आहे. रायगड जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या ओवे पेठ मराठी शाळेची पडझड झाली होती. विद्या दानाचे काम होणार्या या विद्यालयाची इमारत तौक्ते वादळात नुकसानग्रस्त झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होणार हे निश्चितच होते. प्रभाकर जोशी व त्यांचा मुलगा संदेश हा सुद्धा याच शाळेत शिकले. सध्याच्या घडीला कोरोना आणि त्या अनुषंगाने लॉकडाऊन, पावसाळा परिस्थिती पाहता दुरुस्ती कामाला उशीर झाला असता, त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर जोशी यांनी पुढाकार घेत स्वखर्चाने दुरुस्ती करून दिली आहे. त्यामुळे फार मोठा दिलासा विद्यार्थ्यांना मिळाला आहे. तरुण मुलगा संदेशच्या निधनामुळे प्रभाकर जोशी व कुटुंबीयांना मोठा झटका बसला होता. जवळपास एक वर्ष त्या धक्क्यातून ते सावरले नव्हते. मुळातच जोशी समाजकार्याची खूप आवड असल्याने त्यांच्याकडून नेहमीच विविध प्रकारची सामाजिक कार्य आयोजित केली जात असत. मुलाच्या निधनाने त्यांचा पालक आत्मा प्रचंड दुखावला, मात्र सामाजिक आत्मा जिवंत ठेवत त्यांनी संदेशच्या स्मरणार्थ अविरतपणे समाजकार्य करण्याचा उद्देश मनाशी बांधला आहे. त्या अनुषंगाने संदेशाच्या स्मरणार्थ यापुढेही समाजकार्य अधिक जोमाने करणार असल्याची प्रतिक्रिया प्रभाकर जोशी यांनी व्यक्त केली.