पाली : प्रतिनिधी
कोरोनाची दुसरी लाट ओसरते न ओसरते तोच तिसर्या लाटेचा संभाव्य धोका वर्तवण्यात आल्याने चिंतेत भर पडली. अशातच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लसीकरणावर भर दिला जातोय. सुधागडातील पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात 18 ते 44 वयोगटासाठी शनिवार (दि. 26) पासून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. शासनाच्या नियमानुसार 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. त्याबरोबरच येथे 45 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांनादेखील कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. सुधागड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत मढवी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकुमार मुळ्ये, डॉ. स्नेहल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहाय्यक स्वप्नजा देशमुख, मोकल, वारगुडे, परिचारिका तावडे, शिपाई शाम खोडागळे यांच्या मदतीने पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.