Breaking News

पोर्तुगालचे आव्हान संपुष्टात

युरो कपमध्ये बेल्जियमकडून पराभव

सेव्हिल ः वृत्तसंस्था
बेल्जियमने माजी विजेत्या पोर्तुगालच्या संघाला अनेपेक्षित धक्का देत युरो चषक फुटबॉल स्पर्धेतून बाहेर केले आहे. करो या मरोच्या बाद फेरीतील सामन्यामध्ये बेल्जियमने पोर्तुगालवर 1-0 ने विजय मिळवत स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. बेल्जियमच्या थोरगन हाझार्डने पहिल्या हाफमध्ये लगावलेला एकमेव गोल हा निर्णायक ठरला. बेल्जियम या संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य राहिला आहे हे विशेष.
राऊण्ड ऑफ 16 म्हणजेच बाद फेरीत तिन्ही सामने बेल्जियमने जिंकले असून ते ब गटामध्ये अव्वल स्थानी आहेत. ग्रुप स्टेजेसच्या सामन्यात त्यांनी तीन सामन्यांमध्ये सात गोल केलेत. दुसरीकडे माजी विजेत्या पोर्तुगालच्या संघाने ग्रुप स्टेजेसमधील तीनपैकी एकच सामना जिंकता आला.
सामन्याच्या 42व्या मिनिटाला थोरगन हाझार्डने नोंदवलेला गोल हा सामन्यातील एकमेव गोल ठरला. थोरगन हाझार्डकडे आलेल्या पासचा त्याने योग्य उपयोग करीत चेंडू गोलपोस्टच्या दिशेने धाडला आणि फर्स्ट हाफ संपण्यासाठी तीन मिनिटे बाकी असताना आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली, जी शेवटपर्यंत कायम राहिली. आता शुक्रवारी बेल्जियमचा सामना इटलीशी होणार आहे.
रोनाल्डो भावूक, चाहतेही हळहळले
पोर्तुगाल पराभूत झाल्यानंतर रोनाल्डो भावूक झाल्याचे पहायला मिळाले. रोनाल्डो आता 36 वर्षांचा असून हा त्याचा शेवटचा युरो कप असल्याचे सांगण्यात येत आहे. सामना संपल्यानंतर निराश झालेल्या रोनाल्डोने आपल्या दंडावर बांधलेली पट्टी काढून जमिनीवर फेकली आणि तो गुडघ्यांवर खाली बसला. त्याचा कंठ दाटून आल्याचे व तो निराश होऊन काहीतरी बोलत असल्याचे कॅमेर्‍यात टिपले गेले. मैदान सोडतानाही रोनाल्डोच्या चेहर्‍यावरील निराशा स्पष्टपणे दिसत होती. रोनाल्डोने मैदानात केलेल्या या कृतीमुळे त्याचे चाहतेही हळहळल्याचे ट्विटरवर पहायला मिळाले. अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply