नवी मुंबई : प्रतिनिधी
नवी मुंबई महापालिका प्रशासनाने आता अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांसाठी त्यांच्या घरी जाऊन त्यांना लस देण्याचे ठरविले आहे. याचे नियोजन पूर्ण झाले असून लवकरात लवकर ही मोहीम सुरू होईल, असे आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले. याआधी पालिकेने अपंगांसाठी ड्राइव्ह इन लसीकरण, बेघरांसाठी बसस्थानके व चौकांत जाऊन लसीकरणाचे स्तुत्य उपक्रम राबविले आहेत.
नवी मुंबई महापालिका प्रशासन जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू झाल्यानंतर योग्य नियोजन करीत जास्तीत जास्त नागरिकांना लस देण्यासाठी प्रयत्नशील आहे. शासनाकडून उपलब्ध लस साठ्यानुसार शहरात लसीकरण सुरू आहे. पालिका प्रशासनाने जसा साठा उपलब्ध होईल तसे नियोजन करीत आतापर्यंत पहिली व दुसरी मात्रा मिळून आठ लाख 11 हजार 159 जणांना लस दिली आहे. हे लसीकरण करताना वंचित घटकांसह शहरात संसर्ग पसरवू शकणार्या घटकांना प्राधान्य देत लसीकरण केले आहे. यात अपंगांसाठी ड्राइव्ह इन लसीकरण करण्यात येत आहे. तर शहरातील बेघरांसाठी प्रशासनाने त्यांच्या जागेवर जात त्यांना लस दिली आहे. त्यानंतर शहरात जास्तीत जास्त संपर्कात असलेल्या घटकांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवत आहे.
आता महापालिका प्रशासनाने अंथरुणाला खिळलेल्या व घरातून बाहेर पडू न शकणार्या नागरिकांसाठी घरोघरी लसीकरण मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. यासाठी संबंधित अंथरुणाला खिळून असलेल्या नागरिकांची पालिका हेल्पलाइनद्वारे माहिती घेत संबंधित डॉक्टरांकडून व त्यांच्या कागदपत्रावरून खात्री करून घेतल्यानंतर अशा व्यक्तींसाठी त्यांच्या घरी जाऊन लस दिली जाणार आहे.
23 नागरी आरोग्य केंद्रांमार्फत ज्या नागरी आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात असे रुग्ण आहेत त्यांच्या लसीकरणाची जबाबदारी त्या नागरी आरोग्य केंद्रांना देण्यात आली आहे. तसेच लस वाया जाऊ नये म्हणून दुपारनंतरच लसीकरण करण्याचे ठरविले आहे.
मागील आठवड्यात गुरुवारी आठ हजार कोविड लस व त्यानंतर शनिवारी 4350 कोव्हिशिल्ड व 250 कोव्हॅक्सिन लस मिळाल्यानंतर अद्याप पालिकेला लस मिळाली नाही. त्यामुळे गुरुवारीही फक्त पालिकेच्या वाशी, नेरुळ, ऐरोली रुग्णालयातच कोव्हॅक्सिनच्या दुसर्या मात्रेचे लसीकरण झाले. असे असले तरी मिळेल तेवढ्या लसींचे नियोजन करून नागरिकांचे लसीकरण करण्यावर महापालिका भर देत असल्याचे दिसून येत आहे.
अंथरुणावर खिळलेल्यांसाठी घरोघरी लसीकरण मोहीम राबविण्याची तयारी महापालिकेने केली आहे. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ही मोहीम राबवण्यात येणार आहे. पालिकेने याबाबत नियोजन केले असून पुढील काही दिवसांत प्रत्यक्ष कार्यवाही करण्यात येईल.
-अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका