Breaking News

धोकादायक पुलांची दुरुस्ती करा

अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील काशिदजवळील पूल वाहून गेला. त्यामुळे महाडच्या सावित्री पूल दुर्घटनेच्या स्मृती जाग्या झाल्या. या दुर्घटनेमुळे जिर्ण आणि धोकादायक पुलांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बांधकाम विभागाने दिलेल्या अहवालानूसार जिल्ह्यातील अनेक पूल आजही धोकादयाक अवस्थेत कायम आहेत. काशीद येथील  दुर्घटनेची दखल घेऊन  रायगड जिल्ह्यातील धोकादायक पुलांच्या दुरूस्तीबाबत तातडीने निर्णय घेणे गरजेच आहे. किमान अतिधोकादायक पुलांची दुरुस्ती करण्याबाबत ठोस निर्णय घ्यायला हवा.

2 ऑगस्ट 2016 रोजी मुंबई-गोवा महामार्गावरील महाड येथील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पूल वाहून गेला होता. त्यानंतर पुलावरून पडून दोन बस आणि एक टव्हेरा गाडी वाहून गेली. यात 42 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जिल्ह्यातील धोकादायक पुलांचा प्रश्न चर्चेत आला होता. आता काशिद येथील जुना पूल वाहून गेला. त्यामुळे जुन्या पुलांच्या दुरूस्तीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

रायगड जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर पनवेल व महाड उपविभागात 13 लहान ब्रिटीशकालीन पूल आहेत. तर काळ आणि गांधारी नदीवर ब्रिटीशकालीन मोठे पूल आहेत. काळ नदीवरील पूल 1871 मध्ये  तर गांधारी नदीवरील पूल 1945 साली बांधण्यात आला आहे. कोलाडजवळ कुंडलिका नदीवर, तर आंबा नदीवर पालीजवळ जूना पूल आहे. सावित्री नदीवरील महाड येथील दादलीपूल, वीर-टोळ मार्गावरील टोळ पूल कमकुवत झाले आहेत.

 बांधकाम विभागाच्या अलिबाग कार्यक्षेत्रात राज्य मार्गावरील 139 पूल आणि जिल्हा मार्गावरील 79 पूलांचा समावेश आहे. यातील रेवदंडा साळाव खाडीवरील पूल आणि सहानपाल्हे पूल धोकादायक झाले आहेत. त्यामुळे या पूलांवरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. अलिबाग-रेवस मार्गवरील खडताळ पूलदेखील जुना आहे. या मार्गावरून सद्या होत असलेली वाहतूक आणि भविष्यात होणारी विकासकामे पाहाता खडताळ  पुलाला पर्यायी पूल उभारणे गरजेचे आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असणारे 14 पूल धोकादायक आहेत. त्या पुलांची तांत्रीक तपासणी करण्याबाबतचा अहवाल कोकण भवन येथील अधीक्षक अभियंता यांना सादर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाच्या अखत्यारीत असलेल्या अंबा नदीवरील पाली पुलावरूनही अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे.

वास्तविक मुरूड तालुक्यातील काशीद जवळील पूल धोकादायक असून त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिकांकडून सातत्याने केली जात होती. त्याकड दुर्लक्ष करण्यात आले. दोन वर्षानंतर या पुलाच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले होते.  दुरुस्तीचे काम सुरु असतांनाच अतिवृष्टीमुळे पूल वाहून गेला आणि दुर्घटना घडली. जेव्हा स्थानिक लोक एखादी मागणी करतात, त्याकडे दुर्लक्ष करणे किती महाग पडू शकते हे काशीद येथील पुलाच्या दुर्घटनेने दाखवून दिले आहे. या पुलाची दुरुस्ती योग्यवेळी केली असती तर हा अपघात टाळला असता.

जिल्ह्यातील अनेक पूल आजही धोकादायक अवस्थेत आहेत, असा अहवाल बांधकाम विभागाने दिला आहे. त्यामुळे या पुलांच्या दुरूस्तीबाबत तातडीने निर्णय घेणे गरजेच आहे. हे पूल तुटल्यास त्याचा मोठा फटका रस्ते वाहतुकीवर होणार आहे. तसेच लोकांचे प्राणही जाऊ शकतात. मुंबई-गोवा महमार्गावरील अनेक पूल जुने आहेत. अशाच प्रकारचे अनेक पूल जिल्ह्यातही  आहेत, जे ब्रिटीशकालीन आहेत. काही स्वातंत्र्यानंतर बांधण्यात आले आहेत. त्यातील काही पूल धोकादायक स्थितीत आहेत तर काही पूल अतिधोकादायक आहेत. या पुलांची तातडीने दुरुस्ती करायला हवी किंवा तेथे पर्यायी पूल बांधणे आवश्यक आहे. महामार्गावरील जुन्या पूलांच्या जागेवर नवीन पूलांचे बांधकाम सुरू करणे गरजेच आहे. ज्या पुलांची कामे अपुर्ण आहेत, ती तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे.

काशीद पूल धोकादायक बनला असल्याची तक्रार गेल्या दोन वर्षांपासून करण्यात येत होती. मात्र बांधकाम विभागाने जुजबी उपाययोजना करण्यापलीकडे काही केले नाही. त्यामुळे ही दुर्घटना घडली.  कोकण रेल्वे मार्गावर नवसर यथे भराव टाकण्याऐवजी तेथे पूल बांधण्यात यावा, असे तेथील स्थानिक लोकांनी सांगितले होते. पंरतु त्याकडे दर्लक्ष करून भराव टाकण्यात आला. त्याचे परिणाम कोकण रेल्वेला भोगावे लागले. त्यामुळे लोकांच्या सूचनांचादेखील सरकारी अधिकार्‍यांनी विचार करायाला हवा. आपल्यालाच सारं कळंत, अशा तोर्‍यात राहू नये. स्थानिक लोकांच्या तक्रारीकडे पुर्णपणे दुर्लक्ष न करता त्यावर कार्यवाही करायला हवी. जिल्ह्यातील सर्व धोकादायक पूलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करून किमान अतिधोकादाय पुलांच्या दुरूस्तीचे काम तातडीने सुरू करायला हवे.

-प्रकाश सोनवडेकर, खबरबात

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply