टोकियो : वृत्तसंस्था
ऑलिम्पिक 2020 ला सुरुवात झाली तेव्हा भारताला हॉकी, बॅडमिंटन, नेमबाजी, कुस्ती, टेनिस अशा क्रीडा प्रकारातून पदक मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. कदाचित अॅथलेटिक्समधून एखादे पदक मिळेल असे वाटत होते, पण कोणी विचार देखील केला नव्हता की गोल्फमध्ये भारताचा खेळाडू पदकाच्या शर्यतीत असेल.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये शनिवारी (दि. 7) रोजी इतिहास घडवला जाऊ शकतो. गोल्फमध्ये महिला वैयक्तिक स्ट्रोक प्ले प्रकारात कोणाच्या ध्यानी मनी नसताना भारताची अदिती अशोक पदकाच्या शर्यतीत आली आहे.
भारताच्या अदिती अशोकने गुरुवारी (दि. 5) टोकियो ऑलिम्पिकमधील गोल्फ स्पर्धेच्या दुसर्या फेरीतही दमदार कामगिरी केली होती. दुसर्या फेरीअखेर ती संयुक्त दुसर्या स्थानी होती. त्यानंतर शुक्रवारी झालेल्या तिसर्या फेरीत देखील अदितीने शानदार कामगिरी कायम ठेवली आणि दुसरे स्थान कायम ठेवले. सध्या अदिती रौप्यपदकाच्या शर्यतीत आहे. कासुमिगासेकी कंट्री क्लबमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. तिसर्या फेरीअखेर अमेरिकेची नेली कोर्डा अव्वल स्थानावर आहे, तर अदिती दुसर्या स्थानावर आहे.
अदितीने पहिल्या फेरीत 67 स्ट्रोकमध्ये अठरा होल पूर्ण केले होते. बुधवारी अखेरच्या अठराव्या होलवर अदितीकडून बोगीची नोंद झाली होती. गुरुवारी मात्र अदितीने चांगली कामगिरी केली. तिने दुसर्या फेरीत एकही बोगी नोंदविली नाही. तिने 2, 6, 15, 17 आणि 18व्या होलवर बर्डिंची नोंद केली. यासह तिने 66 स्ट्रोकमध्ये दुसरी फेरी पूर्ण केली. अर्थात, तिला अठरा होल पूर्ण करण्यासाठी निर्धारित 71पेक्षा पाच स्ट्रोक कमी लागले. अखेरच्या टप्प्यात बर्डिंची नोंद केल्याने अदिती खूश होती. अदितीने 68 स्ट्रोक्समध्ये तिसरी फेरी पूर्ण केली. भारताच्या दीक्षा डागरला तिसर्या फेरीतही चमक दाखविता आली नाही. ती संयुक्त 51व्या स्थानी आहे.
Check Also
भाजप सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करा -प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण
शिवसेना उबाठा पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश अलिबाग : प्रतिनिधीसध्या भाजपचे सदस्य नोंदणी महाअभियान सुरू आहे. या …