नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे, या मागणीसाठी भूमिपुत्रांनी पुकारलेला लढा दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. 10 जूनला मानवी साखळी आंदोलन, 24 जून रोजी सिडको घेराव आंदोलन आणि आता मशाल मोर्चाने वातावरण ‘दिबा’मय होऊन गेल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.
भूमिपुत्र, शेतकरी, प्रकल्पग्रस्त, कष्टकर्यांचे झुंझार नेते दि. बा. पाटील यांनी सर्वसामान्य जनतेला त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्याकरिता आपले संपूर्ण आयुष्य वेचले. आज त्याच ‘दिबां’साठी तमाम जनता एकवटली आहे. ‘कोण म्हणतंय देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय,’ असा निर्धार सर्वांनी केला आहे. ‘दिबां’वर लोकांचे एवढे प्रेम आहे. सिडको, जेएनपीटी ते आताच्या नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात वाजवी दर आणि त्यांचे योग्य पुनर्वसन व्हावे यासाठी दि. बा. पाटील यांनी वेळोवेळी केलेली आंदोलने सर्वश्रुत आहेत, पण त्यांचे कार्य एवढ्यापुरतेच मर्यादित नाही, तर त्याला विविध पैलू आहेत. उच्चशिक्षित ‘दिबां’नी आपल्या ज्ञानाचा उपयोग जनतेच्या हितासाठी केला. जिथे अन्याय तिथे ‘दिबा’ असे जणू समीकरणच बनले होते. एकीकडे ते सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर उतरून लढा देत होते, तर दुसरीकडे जिथे महत्त्वाचे निर्णय होतात, कायदे बनतात त्या विधिमंडळ व संसदेत एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या अभ्यासू शैलीने सरकारला दिशा देत असत. प्रसंगी सरकारला धारेवरही धरत. चांगल्या गोष्टीचे समर्थन आणि वाईटावर प्रहार असा त्यांचा खाक्या होता. गर्भलिंग निदान, अंधश्रद्धा अशा अनेक चुकीच्या प्रथांना त्यांनी कडाडून विरोध केला. आज अनेक चांगले कायदे त्यांच्यामुळेच अस्तित्वात येऊन त्याचा फायदा सर्वांना होत आहे. ‘दिबा’ म्हणजे शेतकरी, प्रकल्पग्रस्त, कष्टकर्यांचे ‘बा’ अर्थात वडील, पालक. उतारवयातही ते जनतेसाठी सक्रियपणे कार्यरत होते. अगदी अखेरच्या काळात रुग्णवाहिकेतून येऊन आंदोलकांना मार्गदर्शन करीत असत. अशा महान नेत्याचे नाव त्यांच्याच कर्मभूमीत होत असलेल्या विमानतळ प्रकल्पाला देण्याची मागणी रास्त आहे. म्हणूनच विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था-संघटना आणि आम जनता असे सर्व जण यासाठी आक्रमक झाले आहेत. याचा प्रत्यय आधी भव्य मानवी साखळी आंदोलनात, त्यानंतर सिडको घेराव विराट आंदोलनात आणि आता मशाल मोर्चात आला. ऑगस्ट क्रांतिदिनी उरण तालुक्यातील जासई येथे सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने मशाल मोर्चा काढण्यात आला होता. या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्य मशाल प्रज्वलित करण्यात आली. मग या मशालीने अन्य मशाली पेटविण्यात आल्या. या सर्व मशाली रायगड, ठाणे, मुंबई, पालघर जिल्ह्यांत सायंकाळी पोहचल्या आणि सर्वत्र रॅली निघाली. यातून हजारो लोकांनी आता माघार नाही, असा इशाराच राज्य सरकारला दिला आहे. ‘दिबां’च्या नावाप्रति असलेल्या जनभावना लक्षात घेऊन राज्य सरकारने विमानतळ नामकरणाबाबत पुनर्विचार करणे आवश्यक आहे, मात्र सरकार उलट दडपशाही करीत आहे. त्यामुळे 16 ऑगस्ट रोजी नवी मुंबई विमानतळाचे काम बंद पाडण्यात येणार आहे. यासाठी ओवळे फाटा येथे भूमिपुत्र जमणार आहेत. ही एक क्रांती असणार आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारने जागे व्हावे; अन्यथा जे काही होईल त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारचीच असेल एवढे राज्यकर्त्यांनी ध्यानात घ्यावे!