ऑलिम्पिक खेळाडूंना जाहीर केले मोठे बक्षीस
तिरुअनंतपूरम ः वृत्तसंस्था
ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणार्या भारतीय पुरुष हॉकी संघाचा गोलकीपर पी. आर. श्रीजेशला अखेर केरळ सरकारने मोठे बक्षीस देण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या खेळाडूंवर त्यांच्या राज्यातील सरकारांनी बक्षिसांचा वर्षाव केला असतानाच दुसरीकडे केरळ सरकारने कोणतेही बक्षीस जाहीर न केल्याने नाराजी व्यक्त केली जात होती. त्याच केरळ सरकारच्या अंतर्गत येणार्या हातमाग विभागाने श्रीजेशचा सत्कार करण्यासाठी धोतर, शर्ट आणि एक हजार रुपये असे बक्षीस देण्याचा निर्णय घेतल्याची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांनी संताप व्यक्त केला होता. अखेर केरळ सरकारने श्रीजेशबरोबरच राज्यामधून ऑलिम्पिकच्या स्पर्धेमध्ये सहभागी होणार्या खेळाडूंसाठी बक्षिसांची घोषणा केली आहे.
भारतीय पुरुष हॉकी संघाने तब्बल 41 वर्षानंतर ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ टोकियोतील स्पर्धेत संपवत कांस्यपदकावर आपले नाव कोरले. भारतीय हॉकी संघाच्या या विजयात गोलपोस्टवर एखाद्या भिंतीप्रमाणे उभा राहून विरोधी संघाची आक्रमणे परतवून लावणारा गोलकीपर श्रीजेशचे त्याच्या कामगिरीसाठी सर्वच स्तरामधून कौतुक झाले. अनेकांनी तर सोशल नेटवर्किंगवर श्रीजेशला ‘द ग्रेट वॉल ऑफ इंडिया’ म्हणत त्याचे कौतुक केले. अत्यंत मोक्याच्या क्षणी श्रीजेशने विरोधकांना गोल करण्यापासून रोखल्याने भारत विजयी ठरला. श्रीजेशवर कौतुकाचा वर्षाव होताना त्याच्या राज्याने मात्र त्याला बक्षीस जाहीर न केल्याबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त केले जात होते. अखेर राज्य सरकारने श्रीजेशला मोठे बक्षीस जाहीर केले आहे.
केवळ श्रीजेशच नाही तर केरळ सरकारच्या मंत्रिमंडळाने राज्यामधून टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या राज्यातील सर्वच्या सर्व आठ खेळाडूंना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper