Breaking News

‘एनआयए’च्या छाप्यात दोन महिलांना अटक

वर्धा ः प्रतिनिधी : वर्धानजीकच्या प्रबुद्धनगरात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) दिल्ली व हैदराबाद येथील अधिकार्‍यांनी छापा टाकून दोन महिलांना ताब्यात घेतले. जुन्या प्रकरणामध्ये या महिलांना ताब्यात घेत चौकशी केली जात असल्याचे बोलले जात असून अद्याप तपास यंत्रणेतील कुठल्याही बड्या अधिकार्‍याने अधिकृतपणे हा नेमका प्रकार काय याचा उलगडा केलेला नाही.

पहाटे चार वाजता छापा टाकून ताब्यात घेण्यात आलेल्या या महिलांना सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास सेवाग्राम पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे बंद खोलीत त्यांची विचारपूस केली जात आहे. एनआयएच्या या चमूमध्ये एका उपपोलीस अधीक्षकासह दोन पोलीस निरीक्षक असल्याचे सांगण्यात आले. या कारवाईची माहिती मिळताच वर्धा पोलीस विभागातील अप्पर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी स्वत: सेवाग्राम पोलीस स्टेशन गाठले होते. सध्या चौकशी सुरू असून चौकशी पथकातील अधिकारी व स्थानिक पोलीस विभागाच्या अधिकार्‍यांकडून मोठी गुप्तता बाळगली जात आहे.

एनआयएचा चमू वर्ध्यात येत त्यांनी चौकशीसाठी महिलांना ताब्यात घेतले आहे. ते जुन्या एका प्रकरणात चौकशी करीत आहेत, परंतु ते प्रकरण नेमके काय हे आम्हालाही सहज सांगणे कठीण आहे. शिवाय या प्रकरणी आम्ही काही बोलणे योग्य होणार नाही.

– डॉ. बसवराज तेली, पोलीस अधीक्षक, वर्धा

2016मधील गुन्ह्याचा तपास?

आयएसआयएसशी संबंध असल्याप्रकरणी केस आरसी 4/2016/एनआयए/डीएलआय या दाखल गुन्ह्याचा तपासाचा एक भाग म्हणून वर्ध्यात छापा टाकून सदर अधिकार्‍यांनी चौकशी केली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. असे असले तरी नेमकी ही कारवाई कुठल्या अनुषंगाने आहे याची माहिती एनआयएच्या अधिकार्‍यांनाच आहे, मात्र त्यांच्याकडून अद्याप कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply