तुल्यबळ संघांमध्ये उपांत्य लढती
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
विश्वचषक स्पर्धेत मंगळवारी (दि. 9) पहिल्या उपांत्य लढतीत भारताची गाठ न्यूझीलंडशी पडणार आहे, तर गुरुवारी (दि. 11) यजमान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा उपांत्य सामना होणार आहे. या चारही संघाचा विश्वचषकातील इतिहास तपासल्यास अंतिम फेरीसाठी चुरस आहे.
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेवर ऑस्ट्रेलिया संघाचे वर्चस्व दिसून येते. ऑस्ट्रेलियाचा संघ आतापर्यंत आठ वेळा उपांत्य फेरीत पोहोचला आहे. यापैकी सात वेळा या संघाने अंतिम फेरीत धडक मारली. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत पाचवेळा विश्वचषकावर नाव कोरले, तर दोन वेळा संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. आता त्यांची लढत यजमान इंग्लंडशी होत आहे.
क्रिकेटचे जन्मदाते म्हणून इंग्लंडला ओळखले जाते, मात्र या संघाला आतापर्यंत एकदाही विश्वचषकावर नाव कोरता आलेले नाही. इंग्लंडने आतापर्यंत सहा वेळा उपांत्य फेरीत मजल मारली, पण एकदाही त्यांना विश्वचषक उंचावता आला नाही. इंग्लंडला तीन वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यंदाच्या विश्वचषकात इयान मॉर्गनच्या नेतृत्वातील इंग्लंडचा संघ चांगला खेळत आहे.
न्यूझीलंडने विश्वचषक स्पर्धेत नेहमीच आपली छाप सोडली आहे, मात्र इंग्लंडप्रमाणे न्यूझीलंड संघाला आतापर्यंत एकदाही विश्वचषक जिंकता आलेला नाही. न्यूझीलंडला आतापर्यंत फक्त एकदा अंतिम सामन्यात धडक मारता आली आहे, तर त्यांनी आठव्यांदा उपांत्य फेरी गाठली आहे. यंदा न्यूझीलंडची कामगिरी समाधानकारक राहिली आहे. चांगल्या सुरुवातीनंतर अडखळत न्यूझीलंडने उपांत्य फेरी गाठली. न्यूझीलंडचा सामना भारतीय संघासोबत होत आहे.
भारतीय संघ सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. प्रमुख खेळाडूंच्या कामगिरीच्या बळावर संघाने उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. गुणतालिकेत भारत अव्वल स्थानावर आहे. विश्वचषकाच्या इतिहासावर नजर टाकल्यास उपांत्य फेरी गाठण्याची भारताची ही सातवी वेळ आहे. भारताने दोनदा विश्वचषकावर नाव कोरले असून, एक वेळा संघ उपविजेता राहिला आहे, तर तीनदा उपांत्य फेरीतून गाशा गुंडाळावा लागला. आता पुढील सामन्यात भारत न्यूझीलंडला नमवून अंतिम फेरीत दाखल होतो का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
वरील आकडेवारी पाहिल्यास 2003प्रमाणे पुन्हा एकदा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम लढत होण्याची शक्यता आहे, मात्र क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते, हे विसरता कामा नये. कोणत्या दोन संघांत
विश्वचषकाचा सामना रंगणार, हे 11 जुलै रोजी निश्चित होणार आहे.