मोहापाडा : रामप्रहर वृत्त
मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री, विकासमूर्ती नितीन गडकरी यांची विजय संकल्प सभा शुक्रवारी (दि. 26) सायंकाळी 6 वाजता मोहोपाडा येथे होणार आहे. या सभेची जोरदार तयारी सुरू आहे.
मोहोपाड्याच्या अचानक मैदानावर होणार्या या सभेस रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भोईर, माजी आमदार देवेंद्र साटम, जेएनपीटीचे विश्वस्त व भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी, आरपीआय कोकण प्रदेश अध्यक्ष जगदीश गायकवाड आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात प्रगती व विकासाची घोडदौड सुरू आहे. त्यामध्ये परिवहन खात्याचे मंत्री असलेल्या नितीन गडकरी यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी देशभरात रस्त्यांचे जाळे उभारून दळणवळण सुकर केले आहे. त्याचप्रमाणे सागरी मार्गाकडेही लक्ष केंद्रित केले आहे. देशहितासाठी कार्यरत असणारे आणि विकासाची गंगा आणणारे कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी म्हणून गडकरी यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे त्यांच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.