खोपोली : प्रतिनिधी
कोरोना संसर्ग निर्बंधामुळे बंद असलेल्या महड (ता. खालापूर) येथील वरदविनायक मंदिराचे दरवाजे घटस्थापनेच्या दिवशी (दि. 7) उघडण्यात आल्याने पहाटेपासूनच भाविक दर्शनासाठी येत होते.
अष्टविनायकापैकी एक असलेल्या महड येथील वरदविनायक मंदिर गेल्या दहा महिन्यांपासून बंद होते. सतत गजबजणारे हे मंदिर भाविकांविना सुनेसूने वाटत होते.
संभाव्य तिसर्या लाटेमुळे मंदिर कधी उघडणार याची शाश्वती नसल्याने परिसरातील छोटे दुकानदार, पुजारी यांची चिंता वाढली होती. परंतु घटस्थापनेच्या दिवशी बाप्पांनी चिंता दूर केल्याची भावना पुजारी मंदार जोशी यांनी व्यक्त केली.
गुरुवारी पहाटे साडेसहा वाजता मंदिर व्यवस्थापक बडगुजर, मुख्य पुजारी आणि भाविकांच्या उपस्थित मंदिराचा मुख्य दरवाजा उघडण्यात आला. या वेळी दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी बाप्पाचा जयघोष केला. मात्र घटस्थापनेचा दिवस असल्याने भाविकांची गर्दी कमी होती.
गणरायाजवळ प्रार्थना आहे की, पुन्हा असे संकट येवू नये. मंदिर उघडण्यात आल्याने सर्वच आनंदी आहेत. परंतु मास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर पालन करणे आवश्यक आहे.
-मोहिनी वैद्य, कार्याध्यक्ष, महड देवस्थान