मुरूड : प्रतिनिधी
राज्य सरकारने मंदिरे खुली करण्याच्या निर्णय घेतल्याानंतर घटस्थापनेच्या मुहुर्तावर गुरुवारी (दि. 7) नांदगाव येथील श्री सिध्दिविनायक मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.
रायगडच्या जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार कोरोनासंदर्भात विशेष खबरदारी घेत चिटणीस गुप्ते कौटुंबिक ट्रस्ट, सेवा मंडळ-नांदगाव, सालकर जोशी पुजारी ट्रस्ट यांनी गुरुवारी पहाटे मंदिराचे दरवाजे उघडले आणि भक्तांसह, पुजारी, मंदिराजवळ असलेल्या छोट्या मोठ्या विक्रेत्यांनी आनंद व्यक्त केला. मंदिराचे पुजारी विनायक जोशी व महेश जोशी यांनी श्रींची पाद्यपूजा केल्यानंतर मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.
मुरूडची ग्रामदेवता कोटेश्वरी देवीचे मंदिरही घटस्थापनेलाच खुले झाल्याने भक्तांनी आनंद व्यक्त केला. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी रांग लावली होती.
एकदरा येथील श्री कालभैरव श्रीराम मंदिराचे पुजारी रामकृष्ण आगरकर यांनी सांगितले की, मागील दीड वर्षांपासून मंदिराचे दरवाजे बंद होते. शासनाच्या आदेशाप्रमाणे गुरुवारी मंदिराचे दरवाजे उघडले असून कोरोनाविषयक नियमावलीचे पालन करून भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जात आहे.