कुडाळ ः प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी चिपी विमानतळ उद्घाटन समारंभासाठी सिंधुदुर्गात आले. त्यानंतर रविवारी (दि. 10) भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला झटका दिला आहे. कुडाळ पंचायत समितीतील शिवसेनेच्या तीन सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिवसेनेसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. कुडाळ पंचायत समितीचे माजी सभापती आणि विद्यमान सदस्य राजन जाधव, सुबोध माधव, प्राजक्ता प्रभू यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे 10, तर भाजपचे आठ असे संख्याबळ आहे. एक वर्षापूर्वी सभापतींनी शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता तीन पंचायत समिती सदस्यांच्या प्रवेशामुळे भाजपचे संख्याबळ आठवरून 11 वर गेले, तर शिवसेनेचे संख्याबळ 10वरून सात झाले आहे. मुख्यमंत्री काल सिंधुदुर्गात येऊन गेले म्हणूनच हा धक्का दिलाय. ही तर सुरुवात आहे. मुख्यमंत्र्यांवर अनेक लोकांचा विश्वास नाही हे दाखवण्यासाठी कुडाळमधील तीन पंचायत समितीच्या सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अजूनही भाजपमध्ये यायचे बाकी आहेत. शिवसेना पक्षप्रमुखांना कोणी किंमत देत नाही, अशी टीका या वेळी निलेश राणे यांनी केली.