Breaking News

दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार!

देवेंद्र फडणवीसांचे नवाब मलिकांना प्रत्युत्तर

मुंबई ः प्रतिनिधी
नवाब मलिकांनी लवंगी फटाका लावलाय. आता त्यांनी लक्षात ठेवावे दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फोडणार आहे. कारण मी काचेच्या घरात राहत नाही. ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डसोबत आहेत अशा लोकांनी माझ्यासोबत बोलू नये, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांना सोमवारी (दि. 1) पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले.
अमली पदार्थांना आळा घालण्यासाठी राज्यात सुरू असलेल्या अमली पदार्थविरोधी दलाच्या (एनसीबी) कारवाया हा एक राजकीय खेळ असून त्याचे सूत्रधार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांचे ड्रग पेडलरशी संबंध आहेत. समीर वानखेडे यांची बदली एनसीबीमध्ये करण्यामागेही फडणवीसांचाच हात होता, असा आरोप राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक यांनी फडणवीस यांची पत्नी अमृता यांचा एक फोटोही ट्विट केलाय.
मलिक यांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले, दिवाळीच्या सुरुवातीला लवंगी फटाका वाजवून फार मोठा आवाज केल्याचा आव नवाब मलिक आणत आहेत. जो फोटो त्यांनी ट्विट केला आहे तो चार वर्षांपूर्वीचा आहे. रिव्हर मार्चच्या अधिकार्‍यांनी आम्हाला विनंती केल्यानंतर आम्ही त्या मोहिमेशी जोडले गेलो होतो. मी त्यांना मदत करीत होतो. त्या गाण्याच्या शूटिंगच्या वेळी हे फोटो काढण्यात आले आहेत. नवाब मलिकांनी जाणीवपूर्वक माझ्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केला. याच्या पाठीमागची मानसिकता दिसत आहे. रिव्हर मार्चने स्पष्ट केले आहे की, तो भाड्याने आणलेला माणूस आहे. त्यामुळे त्यांचा आणि आमचा काहीही संबंध नाही.
भाजपचे ड्रग्ज कनेक्शन आहे असे मलिक म्हणाले, तर त्यांचे जावई ड्रग्जसोबत सापडले आहेत. मग नवाब मलिकांच्या म्हणण्यानुसार अख्खा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ड्रग्जमाफिया व्हायला पाहिजे. कारण संबंध नसलेल्या व्यक्तीसोबत फोटो आल्याने जर कोणी माफिया होत असेल तर ज्यांच्या घरी ड्रग्ज सापडतात त्यांचा पक्ष काय होणार आहे? ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डसोबत आहेत अशा लोकांनी माझ्यासोबत बोलू नये. या संदर्भातील पुरावे तुमच्यासमोर मांडेन, तसेच शरद पवार यांच्याकडेही पाठवणार आहे. त्यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे त्याला आता शेवटापर्यंत न्यावे लागेल, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अमृता फडणवीस यांनीही आरोपांवर भाष्य केले आहे. चोराच्या उलट्या बोंबा का असतात बुवा? कारण विनाशकाले विपरीत बुद्धी असते, अशा मार्मिक शब्दांत अमृता यांनी ट्विट केले आहे.
वाझे पाळायची सवय तुम्हाला आहे, आम्हाला नाही!
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात नीरज गुंडे मांडवली करतात, असे नवाब मलिक म्हणाल्याचे पत्रकारांनी विचारल्यावर फडणवीसांनी त्यावर उत्तर दिले. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना मांडवलीची गरज पडत नाही. आम्ही चर्चा करतो. नीरज गुंडे या संदर्भात स्वतः उत्तर देतील, पण नवाब मलिकांनी एकदा मुख्यमंत्र्यांशी बोलायला हवे. नीरज गुंडे आमचे संबंधित आहेतच. मी जेवढे वेळा गुंडेंच्या घरी गेलो त्यापेक्षा जास्त वेळा उद्धव ठाकरे गुंडेंच्या घरी गेले आहेत. माझ्या आधीपेक्षा त्यांचे संबंध आहेत, पण मलिकांजवळ पुरावा असेल तर त्यांनी द्यावा. वाझे पाळायची सवय तुम्हाला आहे, आम्हाला नाही. आम्ही विनापुराव्याचे आरोप करीत नाही आणि आजपर्यंत केलेले आरोप मला परत घ्यावे लागलेले नाहीत, असेही फडणवीस या वेळी म्हणाले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply