Breaking News

राजकारणातले फुसके बार

देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदाची कारकीर्द कार्यक्षमता आणि पारदर्शकता या दोन गोष्टींसाठी लोकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील. फडणवीस यांच्यावर थिल्लर आरोप करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. मलिक यांनी तेच करत आपली पातळी दाखवली. राजकारणामध्ये परस्परांवर आरोप होऊ शकतात, होत असतात, परंतु कुणाच्या पत्नीस किंवा कुटुंबीयांस त्यात ओढण्याचा प्रयत्न अश्लाघ्य आणि हीन पातळीचा म्हटला पाहिजे. दिवाळी तोंडावर आलेली असताना जनसामान्यांना महागाईला तोंड द्यावे लागत आहे. एकीकडे महागाईचा भस्मासूर अंगावर येत असतानाच दुसरीकडे भेसळयुक्त गोष्टींमुळे सावध राहावे लागत आहे. दिवाळी जवळ आली की भेसळयुक्त मावा किंवा खवा छाप्यामध्ये सापडल्याच्या बातम्या येत असतात. दिवाळसणाला घरी आलेली मिठाई प्रत्यक्षात विषारी असू शकते. अगदी असाच प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा घडताना दिसतो. आधीच महाग झालेले फटाके हौसेपोटी घरी आणावेत आणि सगळेच्या सगळे फुसके निघावेत अशी अवस्था महाविकास आघाडीच्या नेत्यांची झालेली दिसते. असले राजकीय फुसके बार काढण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नवाब मलिक आघाडीवर आहेत. गेले काही दिवस मलिक यांनी रोजच्या रोज पत्रकार परिषदा घेऊन अमलीपदार्थ नियंत्रण विभाग म्हणजेच एनसीबीला लक्ष्य केले होते. एनसीबीचे तपास अधिकारी समीर वानखेडे हे त्यांच्या निशाण्यावर होते. त्याला तितकीच सडेतोड उत्तरे देखील मिळत होती. नवाब मलिक यांचा एनसीबीवरील राग समजून घेण्याजोगा आहे. त्यांच्या जावयालाच गांजा प्रकरणी तब्बल आठ महिने तुरुंगवास भोगावा लागला आहे. मलिक यांच्या आरोपांच्या फैरींमागे महाविकास आघाडीचे इतर नेतेही लपूनछपून उभे राहिले. कोणी का असेना भारतीय जनता पक्षावर तोंडसुख घेत आहे याचाच आनंद मविआ नेत्यांना सर्वाधिक होत असतो. भाजपचे नेते मात्र अत्यंत संयत भूमिका घेत कमीत कमी प्रतिक्रिया व्यक्त करत राहिले. भाजपचे आघाडीचे नेते तर या मलिक विरुद्ध एनसीबी वादामध्ये फारसे पडलेच नाहीत. यामुळेच अस्वस्थ झालेल्या नवाब मलिक यांनी सोमवारी सकाळी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरच गंभीर आरोप केला. फडणवीस हेच महाराष्ट्रातील ड्रग रॅकेटचे मास्टर माइंड आहेत आणि त्यांच्या इशार्‍यानुसारच अमली पदार्थांचा व्यवहार चालतो, असला अत्यंत भंपक आरोप त्यांनी केला. या आरोपावर हसावे की रडावे असाच कोणालाही प्रश्न पडेल. इतके पुरेसे झाले नाही म्हणून की काय, मलिक यांनी फडणवीस यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांचे कुण्या जयदीप राणासमवेतचे छायाचित्र ट्विटरवर प्रसारित केले. चार वर्षांपूर्वी फडणवीस पती-पत्नींनी रिव्हर मार्च या नावाच्या एनजीओसाठी एक रिव्हर अ‍ॅन्थेम गायिले होते. त्यासाठी अभिनय देखील केला होता. या चित्रफितीच्या निर्मितीमध्ये सदरील जयदीप राणा उपस्थित होता. नुकतीच त्याला ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने अटक केली आहे. या सार्‍याचा बादरायण संबंध लावत नवाब मलिक यांनी फडणवीस यांचेच जयदीप राणाशी घनिष्ठ संबंध असल्याचे तारे तोडले. मलिक यांनी केवळ एक लवंगी फटाका फोडून मोठा धमाका केल्याचा आव आणला आहे, पण दिवाळीनंतर मी मोठा बॉम्बस्फोट करीन असा सज्जड इशारा फडणवीस यांनी ताबडतोब दिला, हे बरेच झाले. मलिक यांना येत्या काळात मोठी किंमत मोजावी लागणार यात आता शंका नाही.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply