शेतकर्यांचा साठवण केलेला पेंढा, लाकडे जाळून खाक
कर्जत : बातमीदार
कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीमधील कुरुंग येथील एका शेतकर्याने साठवण करून ठेवलेला पेंढा, गोवर्या आणि लाकडांना अज्ञात व्यक्तींनी लावलेल्या आगीमध्ये मोठे नुकसान झाले आहे. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
कुरुंग गावातील शेतकरी रामचंद्र भोईर यांनी गावाबाहेरील आपल्या शेतावर पावसाळ्यासाठी आपल्या जनावरांचा चारा साठवून ठेवला होता. त्यात पेंढ्यांच्या 1200 मोळ्या, सरपणासाठी लाकडे आणि शेणाच्या गोवर्यांचा समावेश होता. त्याला मंगळवारी (दि. 23) रात्री अज्ञात व्यक्तीने आग लावली.
या घटनेचे वृत्त समजताच रामचंद्र भोईर व त्यांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत साठवण केलेला पेंढा, गोवर्या आणि लाकडे जळून खाक झाली होती.
सामाजिक कार्यकर्ते शशिकांत मोहिते यांनी नायब तहसीलदार संजय भालेराव यांच्याशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. याप्रकरणी शेतकरी रामचंद्र भोईर यांनी नेरळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, महसूल विभागाने या घटनेचा पंचनामा केला आहे.