कर्जत रेल्वे पोलिसांची कामगिरी
कर्जत : बातमीदार
निजामुद्दीन-पुणे दर्शन या एक्स्प्रेस गाडीमध्ये एका प्रवाशाची लॅपटॉप असलेली बॅग विसरली होती. रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे कर्जत स्थानकात ती बॅग ताब्यात घेण्यात आली आणि त्या प्रवाशाला परत करण्यात आली.
अंकीत सिंग सोमवंशी (रा. आजोठा, गुजरात) हे हजरत निजामुद्दीन-पुणे दर्शन एक्स्प्रेस या विशेष गाडीने कल्याण येथे उतरले, मात्र लॅपटॉप असलेली बॅग गाडीत विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. तत्पूर्वी ही एक्स्प्रेस गाडी कर्जत मार्गे पुण्याकडे निघाली होती. सोमवंशी यांनी तत्काळ मध्य रेल्वेच्या मुंबई येथील कंट्रोल रूमला सदर बाब कळवली. मुंबई कंट्रोल रूमने कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याशी संपर्क साधून गाडीत विसरलेल्या बॅगबाबत माहिती दिली. कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शेटे यांनी तातडीने सोमवंशी यांचा लॅपटॉप शोधण्याची जबाबदारी पोलीस कर्मचारी स्वप्नील मसणे यांच्यावर सोपवली.
मसणे यांनी पुणे दर्शन एक्स्प्रेस कर्जत रेल्वे स्थानकात आल्यानंतर गाडीची तपासणी करण्यास सुरुवात केली. गाडी पुणे दिशेकडे रवाना होण्याअगोदर लॅपटॉप असलेली बॅग शोधण्यात त्यांना यश आले. त्यानंतर कर्जत रेल्वे पोलिसांनी त्याची माहिती मुंबई येथील कंट्रोल रूमला दिली. त्यानंतर अंकीत सोमवंशी कर्जतला आले आणि सुमारे 50 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप असलेली बॅग ओळख पटवून ताब्यात घेतली. प्रवाशाला गाडीत विसरलेली बॅग परत मिळवून दिल्याबद्दल कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनने रेल्वे पोलिसांचे आभार मानले.