नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांचे प्रमाण सध्या कमी झाल्याचे निदर्शनास येत असून रुग्णदुपटीचा कालावधी 3196 दिवसांइतका झालेला आहे. तथापि कोरोना अजून पूर्ण संपलेला नाही आणि तिसर्या लाटेचा धोका अजून टळलेला नाही हे लक्षात घेत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निर्देशानुसार अगदी दिवाळीच्या चार दिवसांतही दररोज सरासरी साडेचार हजार इतके टेस्टिंगचे प्रमाण ठेवलेले होते. दिवाळीनंतर आता पुन्हा दैनंदिन साडेसात हजारापर्यंत टेस्टिंग सुरू करण्यात आलेले आहे. रेल्वे स्टेशन, राज्यातील विविध ठिकाणाहून येणार्या व्यापारी, कामगारांची वर्दळ असणारे एपीएमसी मार्केट अशा कोव्हीड प्रसारासाठी जोखमीच्या ठिकाणी विशेष टेस्टिंग बूथ कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे ज्या सोसायटी, वसाहती याठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळतो तेथील प्रत्येक व्यक्तीचे टेस्टिंग करून टारगेटेड टेस्टिंगवर भर दिला जात आहे. तसेच कोरोना रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधाचे प्रमाणही 31 इतके राखले जात आहे आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना कोविड लसीकरणात अडचण होऊ नयेत यादृष्टीने दिवाळीच्या काळातही चार रुग्णालयांमध्ये लसीकरण करण्यात आले. सध्या कोरोनाची रूग्णसंख्या घटताना दिसत असली तरी पहिल्या व दुसर्या लाटेतील रूग्णसंख्या कमी होत ठराविक कालावधीनंतर झपाट्याने वाढण्याचा यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता तसेच चीन, युके, रशिया व इतर देशांतील तिसर्या – चौथ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारे अतिआत्मविश्वास न दाखविता काळजी घेत कोविड सुरक्षा नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने मास्कचा वापर करावाच शिवाय इतरांनाही त्यांच्या व आपल्या आरोग्य सुरक्षेसाठी मास्क वापरण्याचे आवाहन करावे त्याचप्रमाणे कोविड लसीचा दुसरा डोस विहित वेळ झाल्यानंतर त्वरित घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
उपचाराधीन रुग्णही झालेकमी
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरात दिवाळीच्या काळातही कोरोना रुग्णांत अल्पशी घट झाल्याने उपचाराधीन रुग्णसंख्येत घट झाली आहे. मंगळवारी (दि. 9) शहरात 292 उपचाराधीन रुग्ण होते. हे कोरोनाच्या दोन्ही लाटांतील सर्वांत कमी संख्या आहे. शहरात कोरोनाची पहिली लाट नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ओसरली होती, तर दुसर्या लाटेत 11 एप्रिल 2021 ला 11,605 ही सर्वोच्च उपचाराधीन रुग्णसंख्या झाली होती. पहिल्या लाटेत एका दिवसातील सर्वोच्च रुग्णसंख्या 20 ऑगस्टला 477, तर दुसर्या लाटेत ही संख्या 4 एप्रिलला 1441 पर्यंत गेली होती. शहरात हळूहळू कोरोना रुग्ण कमी झाला तसे उपचार घेणारे रुग्णही कमी झाले आहेत. शहरात उपचाराधीन रुग्णसंख्या फक्त 292 वर आली आहे. यातील गृह अलगीकरणात 168 रुग्ण असून प्रत्यक्षात 48 रुग्णांवरच उपचार सुरू आहेत.