पाली : प्रतिनिधी
येथील रिलायन्स कंपनीविरोधात स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांनी कडसुरे येथे सोमवारी (दि. 15)जनआंदोलन छेडण्यात आले. सायंकाळपर्यंत तोडगा न निघाल्याने आंदोलन चिघळले. या वेळी पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड करण्यात आली. स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्त यांना कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करावे, या प्रमुख मागणीसाठी शिहू नागोठणे विभागातील स्थानिक भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त, नलिकाग्रस्तांनी सोमवारी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर व भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पूर्वीची आयपीसीएल व आताच्या रिलायन्स कंपनीविरोधात आंदोलन केले. या वेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना कडसुरे मटेरियल गेटकडे जाऊ दिले नाही, त्यामुळे आंदोलकांनी तेथे ठिय्या मांडला. नोकरीत महिलांना प्राधान्य द्यावे, तसेच कायमस्वरूपी कामगारांचे निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष विश्वजित साळवी यांनी केली. प्रकल्पग्रस्तांचे नेते गंगाराम मिनमिने यांचेही भाषण झाले. रोहा तहसीलदार कविता जाधव, पेण तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे, उपविभागीय अधिकारी विभा चव्हाण या वेळी उपस्थित होत्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी बंदोबस्त तैनात केला होता.