खालापूर : रामप्रहर वृत्त
खालापूर नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने गुरुवारी (दि. 16) महडच्या श्री वरदविनायक मंदिरात गणरायाला श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर साबाईमाता मंदिर, छत्रपती शिवराय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. वणवे येथील ग्रामदैवत व निंबोडे येथील श्रीराम मंदिरात श्रीफळ वाढवून सर्व उमेदवारांनी प्रचारास प्रारंभ केला. या प्रचारामध्ये भाजप नेत्या चित्रा वाघ सहभागी झाल्या होत्या. या वेळी भाजपचे खालापूर संपर्कप्रमुख विनोद साबळे, तालुकाध्यक्ष रामदास ठोंबरे, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, जिल्हा कोषाध्यक्ष सनी यादव, आध्यात्मिक प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष काशिनाथ पारठे, खालापूर शहर अध्यक्ष राकेश गव्हाणकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील, अनंता वाघमारे, राखी गणेशकर, आतिष खेडेकर, लक्ष्मण जाधव, शिवलिंग वाघरे उपस्थित होते. खालापूर संपर्कप्रमुख विनोद साबळे यांनी या वेळी सांगितले की, खालापुरात गेले काही वर्षे शिवसेना, शेकापची सत्ता आहे. मात्र येथे कोणताही विकास झाला नाही. नागरिकांची मुलभूत अशी पाण्याची गरजही ते पूर्ण करू शकले नाही. येथील काही गावांना अद्यापही पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. भारतीय जनता पक्ष येथील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध आहे. खालापूर नगरपंचायत निवडणुकीसाठी वॉर्ड नंबर 3 (वणवे आदिवासी वाडी) रुषिकेश बाबू पवार, वॉर्ड नंबर 4 (निंबोडे गाव) सुनंदा नामदेव नाईक, वॉर्ड नंबर 5 (दांड आदिवासी वाडी) निलम निलेश पारंगे, वॉर्ड नंबर 6 (वणवे गाव), मधुकर दीपक पारठे, वॉर्ड नंबर 12 (खालापूर बाजार पेठ) दीपक मारुती जगताप, वॉर्ड नंबर 13 (खालापूर कुंभार आळी) दिलीप वामन पवार, वॉर्ड नंबर 15 (महड गाव) ज्योती विलास पाटील हे भाजपचे उमेदवार आहेत.