पेण : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गाच्या पनवेल ते इंदापूर रस्ता रूंदीकरणाकरिता खारपाडा (ता. पेण) येथील जमीन संपादित करण्यात आली असून, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये भूमिअभिलेख विभागाचे पेण उपअधीक्षक आणि एनएचएआय (संपादन संस्था) यांनी एकत्रितपणे संपादित जमिनीची पुनर्मोजणी केली आहे. या मोजणीत घोटाळा नाही, असा निर्वाळा पेण प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार शशिकांत वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिला. पनवेल ते इंदापूर महामार्ग रूंदीकरणाकरिता संपादित करण्यात आलेल्या मिळकतीच्या मोजणीसंदर्भात धनाजी पुंडलिक भगत आणि इतरांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका (क्र. 9030/2017) दाखल केली आहे. त्या अनुषंगाने सन 2008, 2013 व 2018 यातील मोजणीच्या तफावती दूर करण्याकरिता उच्च न्यायालयाच्या 22 जानेवारी 2019 च्या आदेशानुसार उपअधीक्षक भूमिअभिलेख पेण आणि एनएचएआय (संपादन संस्था) यांनी 31 जानेवारी 2019 रोजी सदर जमिनीची एकत्रितपणे पुनर्मोजणी केली आहे. या संदर्भात काही वृत्तपत्रात भूसंपादनाबाबत घोटाळा झाल्याचे, तसेच मूळ अभिलेखाप्रमाणे सर्वेक्षण केले असतानाही ते न स्वीकारता तब्बल 140 जमिनी मालकांना दोनदा मोबदला दिल्याचे व सरकारचे कोट्यवधींचे नुकसान झाले असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे, ते वस्तुस्थितीप्रमाणे नसल्याचे स्पष्टीकरण सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार नायब तहसीलदार श्री. वाघमारे यांनी या वेळी दिले. महसूल मंत्र्यांनी आयोजित केलेल्या 22 जानेवारी 2018च्या बैठकीच्या अनुषंगाने 31 आक्टोबर 2018 रोजी मोजणी केली आहे. मोजणी अहवाल प्राप्त झाल्यानुसार सदरच्या संपादित क्षेत्राचा मोबदला वाटाघाटीने देण्याचा प्रस्ताव एनएचआरपीआययू पनवेल यांच्याकडे 26 नोव्हेंबर 2018 रोजी पाठविण्यात आला, मात्र त्यात आणि 2008 मध्ये करण्यात आलेल्या अहवालात तफावत असल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी मोजणी करून अहवाल सादर करण्याबाबत उपअधीक्षक भूमिअभिलेख यांना कळविण्यात आले, तसेच धनाजी पुंडलिक भगत यांच्या याचिकेच्या अनुषंगाने सदर जागेची 31 जानेवारी 2019 रोजी पुनर्मोजणी करण्यात आली असल्याचे नायब तहसीलदार शशिकांत वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.