-प्रसाद ल. भावे, sharpfinvest@gmail.com
भारतीय बाजार एकतर्फी वर जाताना दिसत असला तरी तो या वर्षभरात याच वेगाने वर जाण्याची शक्यता नाही. अर्थात, काही घटना अशा घडत आहेत की तो आता फार खाली येण्याचीही शक्यता नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांना 2021 सारख्या संधी 2022 मध्येही मिळण्याची शक्यता आहे.
नुकतेच माझ्या मोबाईलसाठी मी एक कव्हर डिझाईन करून बनवून घेतलं ज्यावर जीजीभॉय टॉवरचं चित्र असून त्यावर ठळक अक्षरांत SENSEX 1,00,000 असं लिहिलंय. नक्कीच कुतूहलानं अनेकांनी त्याबाबत ‘कधी’ या अगदी अपेक्षित प्रतिक्रियायुक्त प्रश्नांची विचारणा केली. अगदी काळ्या दगडावरील ही पांढरी रेघ म्हणावी तसा हा प्रकार आहे तसंच, सेन्सेक्स 1 लाख कधी? याचं उत्तर कोणीही ठामपणे सांगू शकत नाही हे देखील अधोरेखित सत्य आहे. गरज आहे बाजाराबाबत विश्वास, संयम, समंजसपणा बाळगण्याची.
कोविड-19 साथीच्या रोगाने जगभरातील अर्थव्यवस्था विस्कळीत करायला सुरुवात केली याला आता जवळपास दोन वर्षे झाली आहेत. मार्च 2020मध्ये अभूतपूर्व लॉकडाऊनमुळे आर्थिक गोष्टींना हातभार लावण्यासाठी जगभरातील सरकारं व मध्यवर्ती बँकांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्तेजनांद्वारे सकारात्मक व पूरक प्रतिसाद दिला.
2021 मधील लक्षणीय दुसर्या लाटेनंतर ज्यामध्ये आर्थिक परिणामापेक्षा मानवी प्रभाव अधिक गंभीर होता, हळूहळू अर्थव्यवस्थेत सुधारणा होत गेल्या आणि कंपन्यांच्या कमाईमध्ये पुनर्प्राप्ती पाहण्यास मिळाली. यामुळे जागतिक तरलता वाढीमुळे भारतासह अनेक जागतिक बाजारांना विक्रमी उच्चांक गाठण्यात मदत केली. तथापि, वस्तूंच्या किमतीतील वाढ आणि पुरवठा साखळीतील व्यत्यय यामुळे चलनवाढीचा दर अमेरिकेत जवळपास मागील 40 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला. तर इतर देशांमध्येही चलनवाढीचा दर वाढू लागला, ज्यामुळे जगभरातील मध्यवर्ती बँकांनी त्यांचे आर्थिक प्रोत्साहन सामान्य करण्यावर भर दिला. 2021 हे जागतिक स्तरावर, तसेच भारतातही कोविड लसीकरण मोहिमेद्वारे चिन्हांकित केले गेले ज्यामुळं स्थिर भाव वाढण्यास मदत झाली. कॉर्पोरेट अर्निंग्स सकारात्मक राहतील या आशेनं त्यात भरीव योगदान दिलं.
कमाईतील वाढ व मूल्यांकन
आर्थिक वर्ष 21 मध्ये, आम्ही भारताच्या जीडीपीमध्ये 7.3 टक्क्यांची विक्रमी वाढ पाहिली, परंतु कमाईच्या वाढीमध्ये सुमारे 10 टक्के संकुचित होण्याच्या पूर्वीच्या अपेक्षेच्या विरुद्ध जाऊन निफ्टीच्या इपीएसमध्ये सुमारे 18 टक्क्यांची वाढ दिसली. भारतात दुसर्या तीव्र लाटेचा अनुभव घेऊन आणि आता तिसर्या लाटेची भीती असताना कंपन्यांच्या कमाईमध्ये कोणतीही लक्षणीय घट झालेली दिसत नाहीये आणि यापुढं ती वाढण्याचीच अपेक्षा बाजार बाळगून आहे. त्यात, कॉर्पोरेट्सच्या खर्च कपातीच्या उपक्रमांमुळं त्यांच्या नफ्यात वाढ दिसत असल्यानं जागतिक तरलता वाढीबरोबरच बाजारातील सकारात्मक भावना आणि तेजीला हातभार लागला आहे. तथापि, बाजारातील उच्चांकासह बाजार मूल्यमापन देखील विस्तारलं आहे आणि सध्या ते दीर्घकालीन सरासरीच्या वर आहेत.
मजबूत आर्थिक पुनर्प्राप्ती
एकूण मागणी परिस्थिती सुधारत असल्याचे दिसते जे विविध आर्थिक निर्देशकांद्वारे स्पष्ट आहे. नोमुरा इंडिया बिझनेस रिझम्प्शन इंडेक्स आता महामारीपूर्वीच्या पातळीपासून जवळपास 18 अंकांनी जास्त आहे. भारताचा जीडीपी आर्थिक वर्ष 21 मध्ये विक्रमी 7.3 ने घसरला (स्वातंत्र्यानंतरचं सर्वात मोठं आकुंचन) परंतु आर्थिक वर्ष 22 मध्ये जीडीपी साडेनऊ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. अर्थव्यवस्थेच्या अनेक क्षेत्रांमध्ये, आऊटपूटची महामारीपूर्व पातळी आता ओलांडली गेली आहे आणि नॉमिनल जीडीपीदेखील आता महामारीपूर्व पातळीच्या वर आहे.
आर्थिक उत्तेजनाचे सामान्यीकरण
यूएस फेडरल रिझर्व्हने त्यांचा रोखे खरेदी कार्यक्रम हळूहळू कमी करण्याचा निर्णय घेतला. फेडनं देखील 2022 मध्ये आधीच्या एखाददुसर्या दरवाढीच्या तुलनेत तीन दरवाढ दर्शवल्या आहेत आणि महागाईवर चर्चा करताना ट्रान्झिटरी हा शब्द वापरून सोडला होता, ज्याचा अर्थ निघतो क्षणभंगूर. डिसेंबरच्या बैठकीत, फेडनं 2021 साठीचा डीजीपी अंदाज पूर्वीच्या 5.9 टक्केवरून 5.5 टक्केपर्यंत कमी केला. आपल्या बॉण्ड टॅपरिंग नंतर अमेरिका व्याजदर वाढीचे संकेत देत आहे. याचे फारसे पडसाद आपल्या बाजारात उमटले नाहीत कारण भारतात, आरबीआयने अनुकूल राहात प्रणालीमध्ये तरलता आणण्यास प्राधान्य दिलेलं दिसतंय. भारतातील महागाई तुलनेनं अधिक चांगल्या स्थितीत असल्यानं चलनविषयक धोरणाच्या आघाडीवर थोडीशी सहजता उपलब्ध करून घेता येत आहे.
ऑटो क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांवर (एत) सरकार देखील विशेष भर देताना आणि त्यासाठी पूरक योजना राबवताना दिसत आहे. आगामी अर्थसंकल्पात, विशेषतः ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधा विभागामध्ये अतिरिक्त चालना मिळण्याची शक्यता आहे. त्याजबरोबर पायाभूत सुविधा क्षेत्रं, परवडणारे गृहनिर्माण प्रकल्प आणि आरोग्य पायाभूत सुविधांसाठी सतत वाढत्या अपेक्षा ठेवल्या जात असून त्यात काही वावगं नाही.
बाजाराच्या उच्चांकाला कमाईचा आधार
पीएलआय (प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह) योजनेद्वारे देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्याच्या सरकारच्या उपक्रमाचा चांगला फायदा दिसून येत आहे. मोठ्या संख्येने कंपन्या त्यांचा उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी याचा वापर करू पाहत आहेत. या योजनेला आगामी अर्थसंकल्पात आणखी तरतूद मिळू शकते. नवीन ओमिक्रॉन कोविड प्रकाराने संभाव्य तिसर्या लहरीबाबत काही अनिश्चितता वाढवली आहे, मात्र ती लवकर ओसरेल, असा आशावाद व्यक्त केला जातो आहे. भारत आणि जागतिक स्तरावर वाढलेले लसीकरण कव्हरेज ही लाट मर्यादित ठेवण्यास मदत करू शकते. आम्ही दुसर्या कोविड लाटेवरून (प्रामुख्याने डेल्टा व्हेरिएंटचे) पाहिले आहे की लॉकडाऊन अधिक सुकर केलं गेलं आहे आणि त्यानुसार व्यवसायांनी देखील त्यास अनुसरून रूपांतर केलं आहे- परिणामी 2020 मध्ये पहिल्या लॉकडाऊनच्या तुलनेत कमी आर्थिक हानी झाली, तसेच कंपन्यांच्या कमाईवर सकारात्मक परिणाम झाला आहे. जर कंपन्यांच्या कमाईच्या वाढीचा वेग अपेक्षेप्रमाणे वाढला, तर ते काही प्रमाणात वर्तमान उन्नत बाजार मूल्यांचं समर्थन करण्यास मदत करू शकतं.
2022 हे वर्ष प्रमुख मध्यवर्ती बँकांद्वारे जागतिक चलनविषयक धोरणांचे आणखी एक सामान्यीकरण असू शकेल. रशिया, ब्राझील, तुर्कस्थान, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया इत्यादी देशांच्या अनेक मध्यवर्ती बँकांनी आणि अलीकडेच बँक ऑफ इंग्लंडने 2021 मध्ये व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली आहे. जर पतधोरणाचं सामान्यीकरण अपेक्षेपेक्षा लवकर झालं, तर बाजारांमधील अस्थिरता वाढू शकते आणि उदयोन्मुख भारतासह बाजारपेठेतून रोकड बाहेर जाऊ शकते. तरीही, दीर्घकालीन भारतातील विकासाच्या सर्व शक्यता अबाधित आहेत आणि मजबूत मूलभूत तत्त्वांच्या आधारे समवयस्क उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये भारत हा एक पसंतीचा गुंतवणूक पर्याय राहिला आहे. सध्या मूल्यांकनाच्या दृष्टिकोनातून लार्ज-कॅप कंपन्या अजूनही तितक्याशा वाढलेल्या वाटत नाही आणि करेक्शनमध्ये नक्कीच अशा कंपन्या आकर्षक ठरतील. तथापि, 2022 मध्ये इक्विटींकडून परताव्याची अपेक्षा ही येणारे वार्षिक कॉर्पोरेट रिझल्ट्स व आधीच उत्तम निकालांच्या निकषांवर लागू झालेली मूल्यवाढ यांमध्ये योग्य समन्वय राखून कंपनीनिहाय संधी हेरण्यास येणारं वर्ष निश्चित उत्तम आहे.