कर्जत : प्रतिनिधी
कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बुधवारी शिवजयंती उत्साहात साजरी केली. यावेळी शिवज्योत व पालखी मिरवणूक, शिवजन्म आणि सांस्कृतिक असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. रायगड किल्ल्याची प्रतिकृतीही तयार केली होती. विशेष म्हणजे सुटी असूनही विद्यार्थ्यांनी महाविद्यालय सुरू ठेवण्याची विंनती करून शिवजयंती साजरी केली. बुधवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला प्राचार्य डॉ. मोहन काळे यांनी पुष्पहार अर्पण करून शिवज्योतीचे प्रज्वलन केले. ही शिवज्योत अक्षय कचरे या विद्यार्थ्याच्या मार्गदर्शनाखाली दौडत महाविद्यालयापर्यंत आणल्यानंतर लेझीम पथकाच्या तालावर श्री शिवरायांचा पुतळा पालखीतून महाविद्यालयात आणण्यात आला. तेथे शिवरायांच्या मोठ्या छायाचित्राचे वेगळ्याच पद्धतीने अनावरण करण्यात आले. स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य विजय मांडे व सतीश पिंपरे यांच्या हस्ते समारंभाचे उदघाटन करण्यात आले. डॉ. काळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. प्रा. प्रियांका बांदिवडेकर यांनी शिवचरित्र सादर केले. विद्यार्थी समितीच्या सदस्यांनी रायगड किल्ल्याची प्रतिकृती तयार केली होती. त्यानंतर नयन कासारे या विद्यार्थ्याच्या मार्गदर्शनाखाली दीपेश पांगर, अदिती बढे, सायली धारणे, अक्षता आदी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
पेण न.प.तर्फे शिवाजी महाराजांना अभिवादन
पेण : प्रतिनिधी
येथील नगर परिषदेतर्फे बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी पेण शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयासही त्यांनी पुष्पहार अर्पण केला. पेण नगर परिषदेचे गटनेते अनिरूद्ध पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती तेजस्विनी नेने, नगरसेविका शहेनाज मुजावर, माजी नगराध्यक्ष रघुनाथ बोरेकर, माजी नगरसेविका धनश्री समेळ, मुख्याधिकारी अर्चना दिवे, भाजप शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी, उपाध्यक्ष अजय क्षिरसागर, भास्कर पाटील, संजय कडू, प्रमोद मंडलिक, नगर परिषदेचे कर व शुल्क अधिकारी शेखर अभंग, प्रशासन अधिकारी राजाराम नरूटे, आरोग्य निरीक्षक शिवाजी चव्हाण, भंडार विभाग उमंग कदम, आस्थापन विभाग प्रमुख भरत निंबरे, अतिक्रमण विभाग प्रमुख रमेश देशमुख, रोखपाल नरेंद्र पाटील आदी अधिकार्यांसह कर्मचारी उपस्थित होते.