पनवेल : प्रतिनिधी
महिला दिनाचे औचित्य साधून इनरव्हिल क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मान स्त्रीशक्तीचा या अंतर्गत रोटरी महिला सन्मान पुरस्कार 2019 वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या समारंभात समाजात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या विविध क्षेत्रांतील एकूण 24 महिलांचा गौरव करण्यात आला
पनवेल येथील व्ही. के. हायस्कूलमध्ये झालेल्या या सोहळ्यास डिस्ट्रिक्ट 314च्या डिस्ट्रिक्ट चेअरमन फाल्गुनी मेहता व त्यांच्या मातोश्री भारत व श्रीलंका इनरव्हिल क्लबच्या संस्थापक रक्षा मेहता, रोटरी क्लबचे प्रेसिडेंट व्हि. सी. म्हात्रे, इनरव्हिल प्रेसिडेंट वैशाली म्हात्रे, इनरव्हिल भगिनी, शिक्षक, सत्कारमूर्तींचे कुटुंबीय उपस्थित होते. या वेळी महिलांच्या सन्मानार्थ गीत सादर करण्यात आले; तर जादुगार पी. बी. हांडे यांनी जादुचे प्रयोग सादर करून सर्वांचे मनोरंजन केले. या वेळी विविध क्षेत्रांतील एकूण 24 महिलांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यामध्ये शिक्षिका, संगीत विशारद, नृत्यामध्ये पारंगत, उद्योजिका, वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या महिला, समाजसेविका, अबोली रिक्षाचालक यांचा समावेश होता.