परेश ठाकूर यांची एमएसईबी अधिकार्यांशी चर्चा
कामोठे : रामप्रहर वृत्त
शहरामध्ये विद्युत पुरवठ्यासंदर्भातील नागरिकांना भेडसावणार्या समस्यांबाबत सभागृह नेते परेश ठाकूर यांनी कामोठे येथे एमएसईबीचे सहाय्यक अभियंता गौतम सूर्यवंशी यांची शुक्रवारी (दि. 14) भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या वेळी सेक्टर 25 मधील सोल्जर सोसायटीसमोरील ओव्हरहेड केबल भूमिगत करण्याबाबतच्या दिलेल्या निवेदनासंदर्भात चर्चा करण्यात आली, तसेच गौतम सूर्यवंशी यांनी लवकरात लवकर काम पूर्ण करू, असे आश्वासन दिले.
कामोठे परिसरातील एमएसईबी संदर्भात असलेल्या समस्यांबाबत पनवेल महापालिकेचे सभागृह नेेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत, फॉल्टी मीटर, ओव्हरहेड वायर भूमिगत करणे, ट्रान्सफॉर्मर जवळील स्वच्छता करणे, तसेच इतर समस्यांबाबत करण्यात आलेल्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अधिकार्यांना जलद कारवाई करत या सर्व समस्या लवकरात सोडवाव्या, अशी सूचना केली. त्यानुसार एमएसईबीचे सहाय्यक अभियंता गौतम सूर्यवंशी यांनी या सर्व समस्या लवकरात लवकर सोडवून या संदर्भात सिडको अधिकार्यांसोबर बैठक घेऊ, असे आश्वासन दिले. या वेळी पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ‘क’च्या सभापती अरुणा भगत, नगरसेवक विजय चिपळेकर, विकास घरत, भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, प्रदीप भगत, सुयोग वाफारे, स्वाती केंद्रे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.