जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; डॉ. सूर्यवंशींसोबत चर्चा


अलिबाग : प्रतिनिधी
नागोठणे येथील पूर्वीच्या आयपीसीएल व आताच्या रिलायन्स इंडस्ट्रिजच्या प्रकल्पग्रस्तांनी शुक्रवारी (दि. 3) येथील रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. रिलायन्सविरूद्ध घोषणा देत प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला. लोकशासन आंदोलनाचे नेते माजी न्यायमुर्ती बी. जे. कोळसेपाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेकवेळा या प्रकल्पग्रस्तांनी आंदोलने केली. परंतु त्यांना न्याय मिळाला नाही. या प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी प्रकल्पग्रस्त आले होते. या वेळी प्रकल्पग्रस्तांनी रिलायन्स विरोधात घोषणा दिल्या. प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन त्यांच्याशी आपल्या मागण्यांसंदर्भात चर्चा केली. सभा असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रधान्य प्रमाणपत्रधारक 601 प्रकल्पग्रस्त व 101 नलिकाग्रस्त यांच्या सातबारा उतार्यावर एमआयडीचा शिक्का आहे. परंतु प्रमाणपत्र नाही, अशा सर्व प्रकल्पग्रस्त बाधीत व्यक्तींना कामवार रूजू करून घेण्याची निश्चीत तारीख द्या, प्राधान्य प्रमाणपत्रधारकांना प्रमाणपत्र दिलेल्या तारखेपासून ते आजपर्यंत दर महिन्याचा पगार वार्षिक बोनस व्याजासह द्यावा, सर्व प्रकल्पग्रस्त निवृत्त कामगारांच्या वारसांना कायमस्वरूपी नोकरी मिळाली पाहिजे, निवृत्तीची वयोमर्यादा 58 वरून 60 वर्ष करा, कंत्राटी कामगारांना कायद्याप्रमाणे समान काम समान वेतन अंतर्गत कायम कामगारांइतके वेतन मिळाले पाहिजे, स्थानिक सुशिक्षीत बेरोजगारांना 80 टक्के नोकरी मिळाली पाहिजे, एमआयडीसीने विकसीत केलेला साडेबारा टक्के भूखंड परतावा द्या आदी प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्या आहेत.