नवी मुंबई : बातमीदार, प्रतिनिधी
नवी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने बेलापूर जेट्टीचे उद्घाटन व वॉटर टॅक्सीसेवेचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्र्यांचे आभार मानले. बेलापूर येथून मुंबईसह एलिफंटा लेणीसाठी देखील वॉटर टॅक्सी सेवा दिली जाणार आहे. याआधी वाशीचा ब्रिज नसताना जलवाहतुकीशिवाय नवी मुंबईकरांना कोणताही पर्याय नव्हता. समुद्राचा वापर विकासासाठी होतो हे जलवाहतूकीने जगात दाखवून दिले आहे, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. आमदार मंदा म्हात्रे यांचे व खासदार राजन विचारे यांचे कौतुक उद्धव ठाकरे यांनी केले. त्यांनी सातत्याने या जेट्टीबाबत पाठपुरावा केला होता. सातत्याने माझ्याकडे पत्रव्यवहार केले होते, असेही ठाकरे यांनी सांगितले. या वेळी केंद्रीय बंदरे, नौवहन, जलमार्ग व आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दिल्लीतून ऑनलाइन उपस्थिती लावली. सोनोवाल म्हणाले की, आजचा दिवस हा महाराष्ट्रासाठी महत्वाचा आहे. वॉटर टॅक्सीमूळे नवी मुंबई व मुंबईचे अंतर कमी झाले आहे. वेळेची बचत होणार असून, भविष्यात अनेक नवे प्रकल्प त्यानिनित्ताने उभारले जाऊन विकासाला मदत होणार आहे. सागरमालाद्वारे केंद्रीय मंत्रालयाने या प्रकल्पाला आर्थिक बळ दिले आहे. यापूढे मुंबई, रत्नागिरी, रायगड, ठाणे व सिंधुदुर्ग या सागरी किनार्यांवर देखील प्रकल्प उभारण्याची तयारी असल्याचे केंद्रीय मंत्री सोनोवाल यांनी स्पष्ट केले. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री अस्लम शेख, खासदार राजन विचारे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार मंदा म्हात्रे व मेरिटाईम बोर्डाचे अध्यक्ष अमित सैनी यांची भाषणे झाली. या वेळी राज्यमंत्री दर्जा प्राप्त विजय नाहटा, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, नवी मुंबई पोलीस आयुक्त बीपीनकुमार सिंग उपस्थित होते. बेलापूर ते मुंबई अशी जलवाहतूक सुरू झाल्याने नवी मुंबई व पनवेलकरांमध्ये आनंद पसरलेला दिसून आला.
एकूण सात वॉटर टॅक्सी उपलब्ध
स्पीड बोट – 6
प्रवासी क्षमता – 10 ते 30
वेळ 30 मिनिटे
प्रतिफेरी भाडे – 800 ते 1200 रुपये
कॅटामरान बोट – 1
प्रवासी क्षमता – 56
वेळ 40 ते 50 मिनिटे
प्रतिफेरी भाडे 290 रुपये
या वॉटर टॅक्सीचे भाडेदर जास्त आहे. नागरिकांनी माझ्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. मी मागणी करते की; हे भाडे राज्य शासनाने कमी करून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा. माझ्या प्रयत्नांना यश आले आहे. देशातील दुसरा प्रकल्प असलेल्या मात्र तांत्रिक कारणास्तव रखडलेल्या मरिना प्रकल्पाच्या अडचणी सोडवाव्यात. सिडको मोफत महाराष्ट्र भवन उभारून देण्यास तयार आहे. शासनाने त्याकडे लक्ष द्यावे.
-मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर