पत्रकार संतोष पवार मृत्यू प्रकरण
कर्जत : बातमीदार
शासनाच्या अधिस्वीकृती समितीचे सदस्य माथेरान येथील पत्रकार संतोष पवार यांच्या मृत्यू प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन शासनाच्या वतीने देण्यात आले होते. मात्र मागील पाच महिन्यात कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे कर्जत तालुक्यातील पत्रकारांनी सोमवारी (दि. 1) रायगडच्या जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि शल्य चिकित्सक यांची भेट घेवून कारवाई का होत नाही? याबाबत विचारणा केली.
दरम्यान, येत्या काही दिवसात संतोष पवार यांच्या मृत्यूस जबाबदार असणार्या कर्मचारी, अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले.
पत्रकार संतोष पवार यांचे 9सप्टेंबर 2020 रोजी कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने निधन झाले होते. या प्रकरणी संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी कर्जत तालुक्यातील पत्रकारांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यानंतर पवार यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली. या समितीने 30 सप्टेंबर 2020 रोजी नेरळ येथे येऊन पवार कुटुंबियांचे जाब जबाबही नोंदवून घेतले होते. मात्र मागील पाच महिन्यात कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे पत्रकारांनी सोमवारी रायगड जिल्ह्याच्या प्रमुख अधिकार्यांची भेट घेऊन त्यांना, पत्रकार संतोष पवार मृत्यू प्रकरणाचे काय झाले? याबाबत लेखी निवेदन दिले. या वेळी ज्येष्ठ पत्रकार विजय मांडे, रायगड प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष संतोष पेरणे, जिल्हा प्रेस क्लबचे खजिनदार दर्वेश पालकर, कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष राहुल देशमुख, उपाध्यक्ष नरेश शेंडे, सचिव अजय गायकवाड, खजिनदार कांता हाबळे, सदस्य ज्योती जाधव, गणेश पवार व दिवंगत संतोष पवार यांचे पुत्र मल्हार पवार उपस्थित होेते.
या प्रकरणी शासनाने नेमलेल्या समितीचा अहवाल आपल्याकडे आला असून, येत्या आठ दिवसात ज्यांनी हलगर्जीपणा केला आहे, त्यांच्यावर कारवाई झालेली असेल असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी या वेळी स्पष्ट केले.
यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. त्या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी, कर्जत पोलीस ठाण्याकडून सर्व जबाब घेण्यात आले आहेत, त्यांना जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. शासनाने नेमलेल्या तीन सदस्यीय समितीने जिल्हा शल्य चिकित्सकांना अहवाल सादर केला आहे. संबंधित अहवाल प्राप्त झाल्यानंतर रायगड पोलिसांकडून कायदेशीर कारवाई होईल, असे आश्वासन दिले.
संतोष पवार मृत्यू प्रकरणी हलगर्जीपणा करणार्या डॉक्टर आणि कर्मचार्यांवर शासन कारवाई करील अशी माहिती जिल्हा शल्य चिकिसक डॉ. सुहास माने यांनी दिली.