दोन जणांच्या मुसक्या आवळल्या
पनवेल : वार्ताहर
मोटार गाड्यांची फसवणुक व अपहार करणार्या दोन आरोपींच्या मुसक्या नेरूळ पोलिसांनी आवळल्या असून त्यांच्या अटकेमुळे सात गुन्ह्यांची उकल करून 31 चार चाकी वाहने (किंमत दोन कोटी दहा लाख रुपये) हस्तगत करण्यात आली आहे.
नेरूळ पोलीस ठाण्यात वाहन फसवणुकीसंदर्भात गुन्हा नोंद (गुन्हा नोंद क्रं. 276/2021 कलम 420,406) करण्यात आला होता. या गुन्ह्यात आरोपीने फिर्यादी व इतर साक्षीदारांची चार चाकी वाहने जास्तीचे भाड्याने मोठमोठ्या कंपनीत लावतो असे आमिष दाखवुन त्यांच्याकडून त्यांची चार चाकी वाहने घेतली. पहिल्या एक दोन महिन्याचे भाडे देऊन त्यांच्यामार्फत आणखी इतर लोकांची वाहने भाडे तत्वावर घेतली. यानंतर ही सर्व वाहने तिसर्या व्यक्तीकडे गहाण ठेवून फसवणुक करून पळुन गेले होते.
या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अंधेरी येथे सापळा रचुन छोलेलाल उर्फ राजेश शर्मा (वय 74, रा. खारघर, मुळगांव-जौनपुर राज्य-उत्तर प्रदेश) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास करून त्यांचा साथीदार हरिषदास शिलोत्रे उर्फ पाटील (वय 40, रा. भिवंडी, मुंबई) येथून ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींकडे चौकशी करण्यात आली. यामध्ये त्यांनी फसवणूक करून मिळविलेल्या एकुण दोन कोटी 10 लाख रुपयांच्या एकुण 31 चारचाकी गाड्या महाराष्ट्रासह परराज्यातून हस्तगत करण्यात आल्या. आरोपींकडून गुन्ह्यातील फसवणुक केलेली 100 टक्के मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे.