नवाब मलिक हे केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्तेआहेत असे नव्हे तर सरकारातील एक महत्त्वाचे मंत्रीही आहेत. गेले काही महिने ते विविध प्रकरणांवरून केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपवर रोजच्या रोज आरोपांच्या फैरी झाडत होते. त्यांच्या आरोपांत तथ्य होते अशातला काहीच भाग नाही. ईडी आणि अंमलीपदार्थविरोधी विभागाच्या अधिकार्यांविरुद्ध मलिक यांनी जणु आघाडीच उघडली होती. तपासयंत्रणांना संशयाच्या घेर्यात अडकवण्याचा त्यांचा डाव स्पष्टपणे दिसत होता.
येत्या 10 मार्चच्या आसपास महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल अशी भाकिते भारतीय जनता पक्षाचे राज्यातील अनेक नेते गेले काही दिवस करत होते. उत्तर प्रदेश या महत्त्वाच्या राज्यासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचा करेक्ट कार्यक्रम होणार असे संकेत दिले जात होते हे खरे. परंतु त्यामागे काही कार्यकारणभाव किंवा तर्कशास्त्र होते. गेली सव्वा दोन वर्षे सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील अर्धा डझन नेते तुरुंगाच्या दाराशी रांगेत उभे आहेत अशी टीका होत होती. याचे प्रमुख कारण या मंत्र्यांचीच प्रतिमा हे होते. वनमंत्री संजय राठोड यांची विकेट सर्वाधिक आधी उडाली. एका युवतीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी त्यांना राजीनामा द्यावा लागला. पाठोपाठ राज्याचे गृहमंत्रीच गजाआड जाऊन बसले. आता राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरा असलेले महाविकास आघाडीचे बडे नेते नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) अटक केली आहे. तपासयंत्रणांच्या कडक कारवायांमुळे त्यांचे कुटुंबीयही काही काळ तुरुंगवास भोगून आले. नवाब मलिक यांची लढाई राजकीय नसून वैयक्तिक असल्याचे सहजच कळून येत होते. म्हणूनच नवाब मलिक रोजच्या रोज पत्रकार परिषदा घेऊन नवनवे आरोप करत असताना महाविकास आघाडीतील इतर नेत्यांची त्यांना म्हणावी तशी साथ मिळत नव्हती. मलिक यांनी आरोपांच्या गदारोळात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरच खोट्या नोटांच्या प्रकरणात काही आरोप केले होते. ती त्यांची राजकीय घोडचूक होती असेच आता म्हणावे लागेल. खोट्यानाट्या आरोपांना कसे उत्तर द्यायचे हे फडणवीस यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याला चांगले कळते. फडणवीस यांनी कागदपत्रे फडकावत नवाब मलिक यांच्या एका जमीनव्यवहाराची जाहीररित्या पोलखोल केली. त्याच प्रकरणात ईडीने मलिक यांच्यावर बुधवारी कारवाई केली. मुंबईत 12 मार्च 1993 रोजी झालेल्या भीषण बॉम्बस्फोटातील आरोपीकडून मलिक यांनी जमीनखरेदी केली असा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे. मलिक यांनी अर्थातच हा आरोप यापूर्वीही फेटाळून लावला होता. परंतु हा आरोप खोटा असेल तर मग मलिक यांनी फडणवीस यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला का दाखल केला नाही, हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. फडणवीस यांना कोर्टात खेचणे आपल्याच अंगाशी येऊ शकते हे मलिक यांना चांगलेच ठाऊक असणार. कुविख्यात डॉन दाऊद इब्राहिमची बहीण दिवंगत हसीना पारकर हिच्याशी व्यवहार करून मलिक यांनी एलबीएस रोडवरील तीन एकराची मालमत्ता अवघ्या 55 लाखांत खरेदी केली होती. त्यांनी पैशाचा गैरव्यवहार केलाच, शिवाय त्यांचे मुंबईच्या अंडरवर्ल्डशी लागेबांधे असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे असा आरोप आता ईडीने केला आहे. चौकशीअंती सत्य बाहेर येईलच, परंतु जे घडले ते अपेक्षितच होते हेही तितकेच खरे.