प्रयागराज ः वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशात पाचव्या टप्प्यातील मतदानादरम्यान रविवारी (दि. 27) भीषण घटना घडली. प्रयागराजमधील करेली येथे एका मतदान केंद्रापासून अवघ्या 10 मीटर अंतरावर बॉम्बस्फोट झाला असून यात एक तरुण जागीच ठार, तर एक व्यक्ती जखमी झाला आहे. प्रयागराज जिल्ह्याचे विशेष पोलीस अधीक्षक अजयकुमार यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, सायकलला लावलेल्या पिशवीत ही स्फोटके ठेवण्यात आली होती. पिशवी खाली पडल्याने स्फोट झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. संजय कोल आणि त्याचा चुलत भाऊ अर्जुन कोल हे दोघे या सायकलवर होते. स्फोटात यातील अर्जुन हा जागीच ठार झाला, तर संजय हा जखमी असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. स्फोट झाला तिथून अवघ्या 10 मीटर अंतरावरच मतदान केंद्र असल्याने पोलिसांकडून तो अँगल तपासण्यात येत आहे. ही स्फोटके या दोघांकडे नेमकी कशी आली. सायकलने ते नेमके कुठे चालले होते, याचाही पोलीस शोध घेत आहेत. स्फोटानंतर परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.