Breaking News

दिव्य गर्भसंस्कार दिव्य भारतमुळे गर्भवतींना फायदे -डॉ. भारती पवार

पनवेल महापालिका व प्रजापिता ब्रम्हकुमारीतर्फे शिबिर

पनवेल : प्रतिनिधी
दिव्य गर्भसंस्कार दिव्य भारत या वर्षभर चालणार्‍या या कार्यक्रमांमध्ये भयमुक्त, सशक्त आणि निरोगी जीवन जगण्यासाठीच्या विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला असून गर्भवती महिला निरोगी, आनंदी राहण्यासाठी या कार्यक्रमाची मदत होणार आहे. या कार्यक्रमामुळे गर्भवती महिला निरोगी बाळांना जन्म देऊ शकतील आणि एका निरोगी जगाचे निर्माण करू शकणार आहेत, असे प्रतिपादन केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी ऑनलाइन पध्दतीने उपस्थित राहून केले.
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. 2) पनवेल महानगरपालिका व प्रजापिता ब्रम्हकुमारी यांच्या संयुक्त विद्यमाने आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके या ठिकाणी दिव्य गर्भसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल, उपमहापौर सीताताई पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती हर्षदा उपाध्याय, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, पनवेल ब्रम्हकुमारीजच्या इनचार्ज ताराबेन, डॉ. ई. व्ही स्वामीनाथन, डॉ. शुभदा नील प्रत्यक्ष उपस्थित होते. तर डॉ. नंदिता पालशेतकर, समाजिक कार्यकर्त्या सुधा कांकरिया अनेक मान्यवर ऑनलाइन पध्दतीने उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, एखादा रोग येऊन गेल्यावर सारा देश त्या आपत्तीने ग्रस्त होतो. अशा परिस्थितीत देशातील व्यवस्था सुधारण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. विविध मार्गांचा अवलंब करून वैद्यकिय व्यवस्था सक्षम करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे.
महापौर डॉ. कविता चौतमोल म्हणाल्या की, महापालिका रस्ते, स्वच्छता, पाणी, प्राथमिक आरोग्य याविषयीची कामे करत असते, परंतु ब्रम्हकुमारीजच्या मदतीने आम्ही गर्भवती महिलांसाठी देखील कार्यक्रम करू शकलो. यापुढेही त्यांनी आपले सहकार्य महापालिकेला केल्यास विविध कार्यक्रम राबविणे शक्य होईल.
पहिल्या सत्रात डॉ. शुभदा नील यांनी गर्भवती महिलांनी राग नियंत्रित करून आनंदी रहाणे गरजेचे असल्याचे सांगितले ज्यामुळे गर्भवती महिला निरोगी, संस्कारीत बाळाला जन्म देऊ शकतील. त्यासाठी कराव्या लागणार्‍या विविध उपायांचे त्यांनी सादरीकरण केले. यामध्ये विविध प्रकारचा व्यायाम, प्राणायाम, आहार याविषयीची माहिती दिली तसेच उपस्थितांकडून व्यायामाचे प्रकार करवून घेतले. दुसर्‍या सत्रात डॉ. ई. व्ही स्वामीनाथन यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून आपल्या मुलांना संस्कारित बनविण्यासाठी आई-वडिल आणि पुर्व प्राथमिक शाळेची शिक्षिका महत्वाची असल्याचे सांगितले.
डॉ. नंदिता पालशेतकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी महापालिका नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने उपस्थित महिलांचे हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमास महापालिकेचे वैद्यकिय अधिकारी, अधिकारी, कर्मचारी, गर्भवती महिला, आशा वर्करस्, ब्रम्हकुमारिजचे सदस्य महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply