Breaking News

ज्येष्ठ नागरिक कायदा ठरतोय निरुपयोगी

लवकरच मुलांच्या परीक्षा संपतील, मग पुढचा कालावधी म्हणजे सुटीची मजा घेण्याचे महिने. आपल्या सहलीचे बेत ठरवताना घरातील ज्येष्ठ नागरिकांची तरुण पिढीला अडचण वाटू लागते. त्यामुळे त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास देण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात पुढील तीन महिने घडतात. त्यांची वृद्धाश्रमात सोय करणे आर्थिकदृष्ट्या शक्य असतानाही नवी मुंबई आणि पनवेल महापालिका हद्दीतील उच्चशिक्षित भागात असे प्रकार घडत असतात.  शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदा केला. त्यांचा सांभाळा न करणार्‍या मुलांना त्या कायद्यामुळे शिक्षा होऊ शकते. या कायद्याची  भीती कोणाला वाटत नसल्याचे दिसून येत आहे. आपल्या मुलासाठी शेवटी आईवडील सगळे विसरून आपली तक्रार मागे घेतात. त्यामुळे या कायद्याखाली शिक्षा होण्याचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. उच्चशिक्षित आणि उच्चवर्गीय  महिला आणि पुरुष ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक आणि मानसिक त्रास देताना अश्लील बोलतातच, पण त्यांच्या खासगी भागाला काठीने टोचण्यापर्यंत त्यांची मजल जाते. आईवडिलांवरून वाद झाल्यास तरुण पिढी विभक्त होण्याची टोकाची भूमिकाही घेताना दिसत आहे. यावरून मदर्स डे हा सेल्फी काढून त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकण्यापुरताच असतो हे लक्षात येते. त्यामुळे आजची तरुण पिढी कोठे चालली आहे, असा प्रश्न पडतो.

भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंबपद्धती होती. एकाच कुटुंबात तीन ते चार पिढ्यांतील माणसे गुण्यागोविंदाने नांदत होती. घरात सुसंस्कारित वातावरण असे. छोट्या मुलांवर आजोबा- आजीकडून सुसंस्कार रुजविले जात असत. सर्वांना घरचे जेवण मिळत असे. आध्यात्मिक वातावरणात ज्येष्ठ मंडळी रात्रीच्या वेळी रामायण -महाभारतातील, शिवाजी महाराजांच्या कथा सांगून त्यांच्या मनावर भारतीय संस्कार बिंबवत असत. त्यातून संघटितपणे, प्रेमाने राहायची शिकवण मिळत असे. कुटुंबांचा विस्तार झाला. कामधंदा, नोकरीनिमित्ताने तरुणांना अन्यत्र जावे लागल्याने एकत्र कुटुंबपद्धतीला तडा गेला. आता क्वचितच अशी कुटुंबे पाहायला मिळतात. नोकरीधंद्यानिमित्त मुलाबाळांना शहरांत, परराज्यात जावे लागल्याने मोठमोठी राजवाड्यासारखी घरे मोडकळीला आली आहेत. काही घरांत वयोवृद्ध माणसे तेवढी पाहायला मिळतात. विदेशात स्थायिक झालेल्या मुलांना आपल्या आईवडिलांची काळजी घेण्यास

फुरसत नसते. आपल्या  देशात 2011च्या शिरगणतीनुसार 76 दशलक्ष लोक 60 वर्षे व त्यावरील वयाचे आहेत, तर 80 व त्यावरील वयाचे सहा दशलक्ष लोक आहेत. 2050 साली ही 60 वर्षे वयोमानातील लोकसंख्या 324 दशलक्ष बनेल, तर 80 व त्याहून अधिक वयाची लोकसंख्या 48 दशलक्ष असेल. भारतीय संस्कृतीत ‘मातृदेवो भव, पितृदेवो भव’ ही शिकवण देण्याची गरज भासते. ज्येष्ठांना धनाची, पैशांची आवश्यकता नसते. त्यांना हवे असते प्रेम आणि आपुलकी. माणुसकीची भावना लुप्त होत चालली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची कुचंबणा होत आहे. प्रेमाने चौकशी करणारे कोणी जवळ नसते. उतारवयात सुख व समाधान नसते. ते मिळवून देण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यासाठी घरोघरी भारतीय संस्कृतीची शिकवण देण्याची अत्यंत आवश्यकता आहे.

आर्थिक सुबत्ता, वैज्ञानिक संशोधन, आधुनिक उपचार पद्धती यामुळे वयोमर्यादा वाढली आहे. त्यामुळे समाजात ज्येष्ठ नागरिकांची संख्यादेखील वाढली आहे, पण वाढत्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक समस्यांनाही जन्म दिला आहे. या समस्यांचेही अनेक पैलू आहेत. आर्थिक, सामाजिक, शारीरिक आणि मानसिक अशा स्वरूपाच्या या समस्या असतात. वार्धक्यामुळे शरीर जीर्ण झालेले असते आणि त्यातच शारीरिक व्याधी मागे लागतात. शारीरिक व्याधींसाठी वैद्यकीय उपचारांची गरज असते, पण बाकी समस्यांसाठी समुपदेशन प्रभावी ठरू शकते.दोन पिढ्यांतील अंतर व त्यातून निर्माण होणारे ताणतणाव याचा सामना दोन्ही पिढ्यांना करावा लागतो. मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्गात चंगळवाद आणि स्वकेंद्रीपणा पराकोटीचा वाढला आहे. त्यामुळे कुटुंब एकत्र राहत असले तरीही ‘मी’ माझे एवढेच पाहिले जाते. प्रत्येक वेळी स्वत:चा विचार केला जातो. ही वृत्ती संयुक्त कुटुंबासाठी घातक असते. यातून मग पुढे वृद्धांना मानसिक आणि सामाजिक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा वेळी आपल्या नात्यातील नसणार्‍या आजी-आजोबांच्या आनंदासाठी दरवर्षी कार्यक्रम करणारे संजय दातार आणि त्यांच्या परिवाराचे निश्चितच कौतुक करायला हवे. पनवेल-रसायनी रस्त्यावर असलेल्या कसालखंड येथील दातार इन्स्टिट्यूटमध्ये वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसाठी संजय दातार दरवर्षी आंदोत्सव साजरा करीत आहेत. रायगडसह नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील वृद्धाश्रमातील 300 पेक्षा जास्त आजी-आजोबा यामध्ये सहभागी होतात. मराठी पद्धतीने दिवा ओवाळून प्रत्येकाचे स्वागत करण्यात येते. निरनिराळे खेळ, गाणी, नृत्य व ड्रामा असे भरगच्च कार्यक्रम ठेवण्यात येतात. या वेळी ’ओ मेरी जोहरा जबिन’ म्हणत  ठक्कर आजोबांचे नृत्य पाहून सत्तरी पूर्ण केलेल्या आजींनाही ताल धरावासा वाटतो. अनेक आजी-आजोबांचे हृदय धडकू लागून तारुण्यातील आठवणी जागृत झाल्याचे दिसते. ’कोई लौटा दे मुझे मेरे बिते हुए दिन’ असेच त्यांना वाटले असेल. या वेळी त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद पाहून समाधान मिळत असल्याचे संजय दातार सांगतात. चहा, नाष्टा व जेवणावेळी आग्रह करून वाढणारे आणि प्रत्येकाची चौकशी करणारे संजय दातार, प्रशांत नायर, चेतना अभ्यंकर व त्यांचे सहकारी पाहून ज्येष्ठांचे डोळे पाणावतात. त्या वेळी जाणवते यांना पैसा नकोय, त्यांना थोडेसे प्रेम मुलांनी देण्याची गरज आहे, मात्र आजची तरुण पिढी हे विसरली आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply