पनवेल ः प्रतिनिधी
सोसायटीतील टॉवरमुळे सोसायटीच्या विकासासाठी आर्थिक फायदा होत असल्याने टॉवर काढू नये, अशी कामोठे येथील शुभांगन सोसायटीची आग्रही मागणी असतानाही रहिवाशांच्या विचाराला न जुमानता त्याला विरोध करण्याचा एकतर्फी प्रयत्न प्रशांत जाधव यांनी केला असून त्याला राजकीय रंग देणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया सोसायटीमधील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
सोसायटीच्या वादात झालेल्या या प्रकरणाला निवडणुकीची पार्श्वभूमी देऊन राजकीय वळण देण्याचे अतोनात प्रयत्न झाले, मात्र प्रत्यक्षात ही घटना सोसायटीतील मोबाइल टॉवरच्या विषयाशी संबंधित
होती. 2005 साली या सोसायटीत टॉवर बसविण्यात आल्याने त्याचा फायदा सोसायटीला मेंटेनन्स व सुविधांसाठी होत आहे आणि त्यामुळे रहिवाशांवर आर्थिक भार पडत नसल्यामुळे जवळपास सर्वच रहिवाशांचे टॉवर असण्यास समर्थन आहे. असे असतानाही जाधव यांनी या टॉवरला हटवण्याची मागणी केली. हा टॉवर काढला तर सोसायटी म्हणजेच पर्यायाने रहिवाशांवर आर्थिक भुर्दंड पडणार असल्याने येथील रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यासंदर्भात विजय चिपळेकर यांनी मध्यस्थी करून हा तिढा सोडविण्याचा प्रयत्न केला. याची जाण न ठेवता जाधव यांनी रहिवाशांच्या विरोधात आपली हेकेखोर भूमिका कायम ठेवली. या हेकेखोर भूमिकेला रहिवाशांनी विरोध केला, परंतु त्या बाबीला राजकीय वळण देण्याचे काम जाधव यांनी केले.
रहिवाशांच्या प्रतिक्रिया घेत असताना विजय चिपळेकर याच सोसायटीत राहत असल्याचे स्पष्ट झाले असून सोसायटी व परिसरातील समस्या सोडविण्यासाठी ते तत्पर असल्याची माहिती मिळाली. त्यांना नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचेही मत रहिवाशांनी व्यक्त केले. टॉवर काढावे, असे प्रशांत जाधव सोडून इतर कोणाचेच मत नाही. त्यामुळे सोसायटी व रहिवाशांच्या दृष्टिकोनातून टॉवर काढू नये आणि स्वतःच्या हेतूसाठी सोसायटीला वेठीस धरू नये, अशी प्रतिक्रियाही रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात पत्रकारांनी सोसायटीत जाऊन नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता जाधव यांचे सहकारी सोसायटीत आले. त्यानंतर दोन मिनिटांत पोलीस त्या ठिकाणी आले. दरम्यान, रहिवाशांशी बोलताना त्याचे चित्रीकरण करत असताना कॅमेरामनला कॅमेरा बंद करण्याची दमदाटी जाधव यांच्या सहकार्यांकडून करण्यात आली. त्यामुळे जाधवांची दादागिरी पोलिसांनाही या वेळी प्रत्यक्षात पाहायला मिळाली.