शुद्ध पाणी, दोन रुपये किलो पीठ, आणि विद्यार्थ्यांना मोफत वाहन देणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. 31) आपले संकल्पपत्र प्रसिद्ध केले. राष्ट्रीय राजधानीत पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वांना शुद्ध पाणी, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दोन रुपये किलो दराने गव्हाचे पीठ देण्याचे वचन भाजपने संकल्पपत्रात दिले आहे. त्याचबरोबर गरीब विद्यार्थ्यांना सायकल आणि ई-स्कूटी वाटप करण्यात येईल, असेही आश्वासन देण्यात आले आहे.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, आरोग्य मंत्री हर्षवर्धन, माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्या हस्ते भाजपच्या या संकल्पपत्राचे प्रकाशन करण्यात आले. आम आदमी पक्षाला टक्कर देण्यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून खास घोषणा भाजपने केल्या आहेत.