Breaking News

मिनीट्रेनचे रडगाणे सुरूच

पर्यटकांची पायपीट, एक प्रवासी फेरी रद्द

कर्जत ः बातमीदार

 नेरळ-माथेरान-नेरळचा सध्या पर्यटन हंगाम सुरू असून, मिनीट्रेनचे इंजीन रुळावरून खाली घसरण्याचे प्रकार काही थांबत नाहीत. काल सकाळी माथेरान येथून पर्यटकांना घेऊन निघालेली मिनीट्रेन नेरळकडे येत असताना इंजीन रुळावरून खाली घसरले आणि त्यानंतर पुन्हा सहा

तासांनी रुळावर ठेवण्यात आले. दरम्यान, मिनीट्रेनची दुपारची एक प्रवासी फेरी रद्द करण्यात आल्याने नेरळ येथे थांबून राहिलेल्या प्रवाशांचे हाल झाले.

 नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेन काल सकाळी 9.20 वाजता नेरळ येथे येण्यास निघाली. त्या वेळी 90 प्रवासी प्रवास करीत होते. गाडी नेरळकडे येत असताना जुम्मापट्टी स्टेशनआधी रुळावरून घसरली. काही महिन्यांपूर्वी मिनीट्रेनच्या ताफ्यात आलेले इंजीन प्रवासी डबे घेऊन निघाले होते. जुम्मापट्टी धनगरवाडा येथे आल्यानंतर या मिनीट्रेनचे इंजीन रुळावरून घसरले. अंदाजे साडेदहा वाजता या गाडीचे इंजीन रुळावरून खाली घसरले. तत्काळ इंजीन रुळावर ठेवणे शक्य नसल्याने गाडीमधील रेल्वे कर्मचार्‍यांनी प्रवास करणार्‍या 90 प्रवाशांना पायी चालत माथेरान घाटरस्त्यावर आणले. गाडी बंद पडल्याच्या ठिकाणापासून घाटरस्ता हे अंतर जवळपास दीड किलोमीटरचे असल्याने वातावरणात असलेल्या प्रचंड उष्म्यात प्रवाशांना चालत घाटरस्ता गाठावा लागला. त्याचवेळी त्या सर्व प्रवाशांजवळ असलेल्या बॅगा आणि आपली चिमुरडी मुले घेऊन पायपीट करावी लागली. पुढे घाटरस्त्यावर टॅक्सी पकडून हे 90 प्रवासी नेरळ रेल्वे स्थानकात पोहचले.

 मिनीट्रेन साडेदहा वाजता बंद पडली होती. त्यानंतर नेरळ लोको येथून कामगार त्या ठिकाणी पोहचले आणि रुळावरून खाली उतरलेले इंजीन पुन्हा उचलण्याचा प्रयत्न करू लागले. शेवटी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास इंजीन पुन्हा रुळावर ठेवण्यात लोको कामगारांना यश आले, मात्र नॅरोगेज रुळावर गाडी बंद पडल्याने महाराष्ट्र दिनी नेरळ रेल्वे स्थानकात मिनीट्रेनचा प्रवास करण्यासाठी बसून असलेल्या प्रवाशांची मोठी धावपळ झाली. कारण नेरळ येथून दुपारी 2.20 मिनिटांनी माथेरानकरिता जाणारी मिनीट्रेन रद्द करण्यात आली होती. त्यामुळे सकाळपासून दुपारच्या गाडीतून प्रवास करण्यासाठी नेरळ स्थानकात बसून राहिलेल्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

Check Also

अलेक्झांड्रा थिएटरची इमारत झाली 103 वर्षांची

आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढी मुव्हीज (आजची युवा पिढी चित्रपटाला मुव्हीज म्हणते) पाहण्यासाठी मल्टीप्लेक्स, मोबाईल …

Leave a Reply