Breaking News

मेंदडी येथील विवाहितेची आत्महत्या

पती आणि सासरा अटकेत

म्हसळा : प्रतिनिधी

नवर्‍याजवळ पटत नाही म्हणून तीन महिने माहेरी वास्तव्यास गेलेल्या 24 वर्षाच्या विवाहितेने गळफास लाऊन आत्महत्या केल्याची घटना म्हसळा तालुक्यातील मेंदडी गणेशनगर येथे गुरुवार (दि.10) सायंकाळी घडली. प्रणाली निलेश नाक्ती (रा. खरसई) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून म्हसळा पोलिसांनी तिचा पती व  सासर्‍याला अटक केली आहे.

प्रणाली हिचे खरसई येथील निलेश नाक्ती याच्याबरोबर रीतीरिवाजाप्रमाणे विवाह झाला होता. मात्र त्या दोघांचे एकमेकांशी पटत नव्हते. मागील तीन महिन्यापासून प्रणाली मेंदडी येथे तिच्या माहेरी राहायला गेली होती.

गुरुवारी संध्याकाळी प्रणाली हिने घरात कोणीही नसताना लाकडी भालास ओढणीने गळफास लाऊन आत्महत्या केली. या प्रकरणी प्रणालीचे वडील गोपाळ अर्जुन पाटील (वय 45, रा. मेंदडी, ता. म्हसळा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन म्हसळा पोलीस ठाण्यात भादवि कलम 306,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, प्रणाली हिने मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत तिचा सासरी छळ होत आसावा, असा संशय  आल्याने म्हसळा पोलिसांनी तिचा पती नीलेश मालजी नाक्ती (वय 30) आणि सासरा मालजी धोंडू नाक्ती (वय 68) यांना अटक केली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक उध्दव सुर्वे यांनी दिली.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply