Breaking News

विळे-भागाड औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करावी

नागरिकांची मागणी

माणगाव : प्रतिनिधी

महाड तालुक्यातील बिरवाडी, रोहा तालुक्यातील धाटाव येथे स्वतंत्र पोलीस ठाणे कार्यरत आहे. त्याच धर्तीवर माणगाव तालुक्यातील विळे-भागाड औद्योगिक वसाहतीत स्वतंत्र पोलीस  ठाणे उभारावे, अशी मागणी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर करीत आहेत. नव्याने निर्माण होणार्‍या विळे-भागाड औद्योगिक क्षेत्राला सुरक्षा देण्याच्या दृष्टीने तत्कालीन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरकारने स्वतंत्र नवीन पोलीस ठाणे उभारण्याची घोषणा केली होती, मात्र ती हवेतच विरल्याने या वसाहतीत अद्यापही स्वतंत्र पोलीस ठाणे अस्तित्वात आले नाही. त्यामुळे या भागातील गुन्हेगारांना रान मोकळे झाले असून, येथील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा  चव्हाट्यावर आला आहे. माणगाव तालुक्यातील विळे-भागाड परिसरामध्ये औद्योगिक वसाहत विकसित करण्यासाठी 28 वर्षांपूर्वी या भागातील अनेक  शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. या औद्यागिक क्षेत्रात विविध कंपन्यांनी बांधकामे, तर  काही कंपन्यांनी जमीन सपाटीकरणाची कामे केली आहेत. काही कंपन्यांत उत्पादन सुरू झाले आहे. येथील कंपन्यांत काम करण्यास जिल्हा व जिल्ह्याबाहेरून तसेच अन्य राज्यांतूनही कामगार मोठ्या संख्येने आले असून, या भागात अनेक लहानमोठ्या दुर्घटना, अपघात तसेच चोर्‍या व घरफोड्या होण्याचे प्रमाणही वाढले आहे.  माणगाव तालुका पोलीस ठाण्यांतर्गत रवाळजे धरणाचे काम सुरू असताना या भागात मोठ्या प्रमाणात मजूर व नोकर आले होते. त्याचा विचार करून 1982मध्ये रवाळजे येथे पोलीस दूरक्षेत्राची स्वतंत्र इमारत उभारून तेथे पोलीस कर्मचारी नेमण्यात आले होते. या धरणाचे काम 32 वर्षांपूर्वी पूर्ण झाले. त्यानंतर येथील कामगारही निघून गेले. तरीही या ठिकाणचे पोलीस कर्मचारी तेथेच काम करीत आहेत.  विळे गावात किंवा औद्योगिक क्षेत्रात स्वतंत्र पोलीस ठाणे उभारावे, अशी नागरिकांची मागणी गेली अनेक वर्षांपासून आहे. त्यावेळचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राज्यातील औद्योगिक विकास महामंडळाने औद्योगिक क्षेत्रासाठी सर्व यंत्रणा व सुविधांसह स्वतंत्र पोलीस ठाणी उभारण्यात येतील, असे जाहीर केले होते. त्यासाठी औद्योगिक क्षेत्रात जागा उपलब्ध करून बांधकाम करावे, असे सांगितले होते, मात्र अद्यापही विळे-भागाड औद्योगिक क्षेत्रात स्वतंत्र पोलीस ठाणे उभारले गेले नाही.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply