पनवेल : वार्ताहर महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कामोठे येथील एकता सामाजिक या संस्थेने दोन तास शहरासाठी या उपक्रमांतर्गत बुधवार दिनांक 1 मे रोजी कामोठे सेक्टर 20 येथील ज्येष्ठ नागरिक उद्यानाची स्वच्छता केली. सकाळी 7 वाजता एकता सामाजिक संस्थेचे सदस्य उद्यानाजवळ जमले व उद्यान स्वच्छ करण्यास सुरुवात केली. प्रशासनाकडे बोट दाखवण्यापेक्षा आपण सुजाण नागरिक म्हणून आपल्याला शक्य असेल त्याप्रमाणे निसर्ग संवर्धनाचे काम केले पाहिजे, या हेतूने केलेल्या एकता सामाजिक संस्थेचे हे काम खरोखरच प्रशंसनीय आहे. या वेळी संस्थेच्या अमोल शितोळे, अजिनाथ सावंत, अल्पेश माने, मंगेश आढाव, दशरथ माने, रवींद्र जाधव, घनश्याम वंजारी, निलेश भोसले, अजित चौकीकार व हरेश बाबरीया यांनी मोहिमेत सहभाग घेतला. कामोठे सेक्टर 20 येथील ज्येष्ठ नागरिक उद्यानात मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला असून यामध्ये प्लॅस्टिकच्या कचर्यासह, दारूच्या बाटल्या, बॅनर्स, लग्नपत्रिका, पालापाचोळा, टोपल्या यासारखा विविध प्रकारच्या कचर्याने उद्यानाला अक्षरशः कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले होते. या वेळी तब्बल 37 थैल्यांमध्ये कचरा संकलित करण्यात आला. एकता सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी उद्यानात मोठ्या प्रमाणात साठलेला हा कचरा उचलून उद्यानाची स्वच्छता केली. विशेष म्हणजे सकाळी जॉगिंगसाठी आलेल्या लहान थोर मंडळींनी देखील स्वच्छता उपक्रमास स्वेच्छेने हातभार लावला. एकता सामाजिक संस्था निसर्ग संवर्धन, सामाजिक व शैक्षणिक अशा अनेक पातळीवर कार्य करीत असून महाराष्ट्र दिनानिमित्त उद्यानाच्या स्वच्छतेसाठी घेतलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल संस्थेचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.