Breaking News

लॉकडाऊनबद्दलचा मेसेज फॉरवर्ड करताना सावधान!

पोलिसांचा वॉच; कारवाई होणार

मुंबई : प्रतिनिधी
लॉकडाऊनसंदर्भात सोशल मीडियावर आलेला मेसेज फॉरवर्ड करीत असाल, तर खबरदार! कारण लॉकडाऊनबद्दलच्या मेसेजमुळे पोलिसी कारवाईला सामोर जावे लागू शकते. सोशल मीडियातून लॉकडाऊन होणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात असून, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते आहे. या पार्श्वभूमीवर सायबर सेलला लॉकडाऊनच्या अफवा पसरवणार्‍यांवर नजर ठेवण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत.
राज्यात कोरोनाचे संकट वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच दुसरीकडे लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. व्हॉट्सअपसह सोशल मीडियातून लॉकडाऊन लागू होणार असल्याच्या आणि लॉकडाऊन लागू करण्यात आल्याच्या अफवा पसरवल्याचा जात आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अफवा पसरवणार्‍यांना ताकीद दिली आहे.
राज्यातील अनेक शहरांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रात्रीची संचारबंदी आणि अन्य निर्बंध  लागू करण्यात आले आहे, मात्र सोशल मीडियावर राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. अशा प्रकारच्या अफवा पसरविणार्‍यांवर सायबर गुन्हे शाखेची करडी नजर आहे. कुठल्याही अधिकृत माहितीशिवाय खोटी माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी दिले आहेत.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply