अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील तापमानात मागील दोन दिवसात अचानक वाढ झाली आहे. अलिबाग चुंबकीय वेधशाळेत सोमवारी (दि. 14) कमाल तापमान 38 अंश सेल्शियसवर पोहोचले. त्यामुळे उन्हाच्या झळांनी रायगडकर बेजार झाले आहेत.
वाढत्या तापमानामुळे रायगडकरांना उन्हाचा तीव्र चटका बसत असून उष्म्याच्या त्रासाने नागरिक हैराण झाले आहेत. अंगाची लाहीलाही करणार्या या उकाड्याने रायगडकर त्रस्त झाले आहेत.
मागील दोन दिवसापासून उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. पारा 38 अंश सेल्सिअसच्या पार गेल्याने नागरिक पुरते हैराण झाले आहेत. सकाळी 10 वाजल्यापासूनच उन्हाचे चटके बसायला सुरूवात होते.
रायगड जिल्हयाचा विचार केला तर अलिबाग, मुरूड, श्रीवर्धनसारख्या किनारपट्टी भागात तापमान कमी असले तरी हवेत आर्द्रता खूप आहे. त्यामुळे घामाच्या धारांनी अंग भिजून जात आहे. तर महाड, पोलादपूर माणगाव, खालापूर यासारख्या भागात अंगाला चटके बसत आहेत.
एकीकडे उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असताना तहानलेला जीव थंड पेयाकडे आकर्षित होत आहे. नारळपाणी, कोकम सरबत, लिंबू सरबत, उसाचा रस, फळांचे ज्युस, आईस्क्रीम यासारख्या थंड पेयांना मागणी वाढली आहे.