पनवेल : नितीन देशमुख
पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी झाडे लावा म्हणून शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत असताना पनवेल महापालिका हद्दीत मात्र जाहिराती लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात येत आहे, अशा जाहिरातदारांचा ठेका रद्द करावा, अशी मागणी महासभेत सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केली.
पनवेल महापालिकेची सर्वसाधारण महासभा बुधवारी (दि. 19) सकाळी साडेअकरा वाजता क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. श्रध्दांजली आणि अभिनंदनाचे ठराव झाल्यावर डॉ. अरुणकुमार भगत यांनी डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करणारा मांडलेला ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. अमर पाटील यांनी कळंबोलीत जाहिरातीचे फलक लावण्यासाठी झाडांची कत्तल केल्याबद्दल मांडलेल्या लक्षवेधीवर चर्चा करताना नवीन पनवेलपासून सगळीकडे जाहिरात पूर्ण दिसावी म्हणून झाडांची कत्तल झाल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. त्यासाठी काही ठिकाणी झाडांची कत्तल केली जात असल्याची तक्रार करण्यात आली. यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अशा जाहिरातदारांचा फलक लावण्याचा ठेका रद्द करावा, अशी मागणी केली.
मोडकळीस आलेल्या इमारतींचा सर्व्हे करून नोटिसा दिल्याच्या लक्षवेधीच्या वेळी धोकादायक आणि अतिधोकादायक किती आहेत, याची माहिती मागितली असता पनवेल महापालिका हद्दीत 59 इमारती धोकादायक असल्याचे सांगण्यात आले. सिडको हद्दीतील सर्व्हे सिडकोच करीत असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी विकसकाच्या फायद्यासाठी अधिकार्यांनी कोणालाही नोटीस दिली जाणार नाही, याची काळजी घेण्याची मागणी करण्यात आली. नगरसेविका वृषाली वाघमारे यांनी ई-टॉयलेटबाबत विचारलेल्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. सिडकोची एनओसी नसल्याने ई-टॉयलेट बसवता आली नाहीत आणि ठेकेदाराने 20 मोबाईल टॉयलेटचा पुरवठा न केल्याने निविदा रद्द करून नवीन निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली. सभेत प्रशासकीय अधिकार्यांबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या.
सभेच्या सुरूवातीला आपत्ती व्यवस्थापनाची माहिती आणि प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
सिडको अधिकार्यांच्या कारभारावर नाराजी
सिडकोच्या अधिकार्यांमुळे सिडको हद्दीतील नगरसेवकांना काम करण्यास अडचणी येत आहेत. याबाबत नगरेसवकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सिडको 1970 मध्ये स्थापन झाल्यापासून 21 व्या शतकातले शहर वसवणार, असे म्हटले जात होते. सिडकोने बाजार, रस्ते, फुटपाथ, पार्किंग व्यवस्था, उद्याने आणि कम्युनिटी सेंटर केलेली दिसत नाहीत, पण यासाठी जागा मालकांकडून पैसे मात्र घेतले आहेत. कोणत्याही पायाभूत सुविधा पुरवल्या नाहीत. महानगर पालिका स्थापन झाल्यापासून सिडको कोणतेही काम करण्यात चालढकल करीत आहे, त्यासाठी या सुविधा पुरविण्याचे काम महापालिकेने ताब्यात घेणे आवश्यक असल्याचा ठराव सभागृह नेते परेश ठाकूर यांनी यापूर्वी मांडला होता, त्याची कार्यवाही करण्याची मागणी केली. यावेळी सिडकोच्या कारभारावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केल्याने सिडकोचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्यासोबत अधिकार्यांच्या कारभाराबाबत मुख्यमंत्र्याकडे बैठक घेण्याचे ठरले.
महापालिकेने नवनाथ नगर झोपडपट्टी पाडली, त्याठिकाणी रस्त्याच्या बाजुला पत्रे लावण्यात आले आहेत. पण हॉटेल सुभाष पंजाब जवळ पत्रे लावताना 10 फुट जागा सोडण्यात आली आहे. तेथे आता बांधकाम सुरू असल्याची माहिती नगरसेवक मनोज भुजबळ यांनी सभागृहाला दिली. या हॉटेलजवळ जागा सोडण्याचे कारण काय, हे बांधकाम कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, असे विचारताच आयुक्तांनी हे काम थांबविण्यात येईल, असे सांगितले.