नुकसानभरपाई देण्याबाबतच्या दुसर्या बैठकीतही निर्णय नाही
उरण : प्रतिनिधी
न्हावा-शिवडी सी-लिंकमुळे बाधित झालेल्या न्हावा गावातील 789 मच्छीमारांच्या नुकसान भरपाईच्या मुद्यावर सोमवारी (दि. 14) बोलवण्यात आली होती, मात्र या बैठकीतही कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. एमएमआरडीएच्या अधिकार्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेण्यासाठी आणखी 15 एप्रिलपर्यंत मुदत मागितली आहे.
न्हावा ग्रामपंचायतीच्या हद्दीत न्हावा-शिवडी सी-लिंक प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पामुळे गावातील 789 मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. एमएमआरडीएला 789 बाधित मच्छीमारांची यादीही सादर करण्यात आली होती, मात्र आश्वासन देऊनही एमएमआरडीए नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ करीत आहे. अखेर न्हावा ग्रामस्थांनी 14 मार्चपासून सी-लिंक प्रकल्पाचे काम बंद पाडण्याचा इशारा दिला होता. यानंतर एमएमआरडीए अधिकार्यांनी शुक्रवारी (दि. 11)
बैठक बोलाविली होती, मात्र या बैठकीत तोडगा निघाला नाही. त्यामुळे एमएमआरडीए अधिकार्यांनी सोमवारी (दि.14) ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला मुंबईत चर्चेसाठी आमंत्रित केले होते.
या बैठकीत उपजिल्हाधिकारी भूटाले, एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता एम. पी. सिंग, कुलकर्णी, विद्या केणी, सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या वतीने न्हावा सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, हनुमंत भोईर, सदस्य सागर ठाकूर, किसन पाटील, न्हावा ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत भोईर, माजी अध्यक्ष आशिष पाटील, भाजप अध्यक्ष तुषार भोईर आदी उपस्थित होते.
…तर केव्हाही प्रकल्पाचे काम बंद पाडू
ग्रामस्थांनी मुदत नाकारल्यास प्रकल्पाविरोधात कामकाज बेमुदत बंद आंदोलन केव्हाही सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी रोखठोक भूमिका न्हावा ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने मांडली आहे.