महाड ः प्रतिनिधी
स्वारगेट-विन्हेरे (महाड) एसटी बसला मंगळवारी (दि. 15)ताम्हिणी घाट उतरत अपघात होऊन ही बस उलटली. यात वाहकासह 11 प्रवासी जखमी झाले आहेत. स्वारगेट बसस्थानकातून सकाळी 10 वाजता निघालेली बस (एमएच 14-बीटी 4684) महाड विन्हेरेकडे येत होती. ताम्हिणी घाट उतरत असताना कोंडेथर येथे ही बस दुपारी उलटली. या अपघातात वाहक व 10 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले. या अपघातास कारणीभूत असलेला चालक विलास संभाची वराठे (वय 58, रा. सोनापूर, पुणे) याच्यावर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खोपोलीत रिक्षा उलटून एक ठार, तीन जण जखमी
खोपोली, खालापूर ः येथील शिळफाट्यावरील वळणावर मंगळवारी (दि. 15) रिक्षा उलटून एक जण जागीच ठार झाला असून तिघे जखमी झाले आहेत. अनिल प्रजापती असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते व त्यांचे कुटुंबीय रिक्षाने प्रवास करीत असताना हा अपघात झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.