पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलच्या प्रथम नागरिक अर्थात महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांना राज्यस्तरीय नवदुर्गा पुरस्कार 2022 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नवी मुंबईतील कलासाधना सामाजिक संस्थेच्या वतीने महिला दिनानिमित्त कामोठ्यात हा पुरस्कार सोहळा झाला. या वेळी विविध स्तरांवर उल्लेखनीय कामगिरी करणार्या महिलांचा सन्मान करण्यात आला होता. अनेक जबाबदार्या यशस्वीपणे सांभाळून कामगिरी चोख बजावणार्या महिलांना मानाचा मुजरा करणे हे मुख्य उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. पनवेल महापालिकेची स्थापना झाल्यानंतर डॉ. कविता चौतमोल यांच्या रूपाने महापौरपदाचा बहुमान एका महिलेला मिळाला ही बाब समस्त महिलावर्गासाठी अभिमानास्पद आहे. वैद्यकीय क्षेत्राशी निगडित व उच्चविद्याविभूषित डॉ. चौतमोल यांनी गेल्या पाच वर्षांत महापौरपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. कोरोना काळात त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय ठरले आहे. महिलांसाठी त्यांनी वेळोवेळी अनेक कार्यक्रम तसेच त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्याचबरोबर महापौर सहाय्यता निधी अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरजूंना गंभीर आजारांसाठी आर्थिक मदत करण्यात येत आहे तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या आपत्तीग्रस्तांना, अपघातामुळे मृत्यू किंवा कायमस्वरूपी दुखापत, कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्यांनाही आर्थिक मदत देण्यात येते. नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.