Breaking News

कोरोनाचा पुन्हा धोका?

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा संसर्ग ओसरल्यानंतर सर्वांना दिलासा मिळाला असतानाच आता पुन्हा एकदा कोविड विषाणूने उगमस्थान असलेल्या चीन तसेच अन्य देशांमध्ये डोके वर काढले आहे. दक्षिण कोरियातही कोरोनाने हाहाकार माजवला असून अनेक ठिकाणी परत लॉकडाऊनची वेळ आली आहे. अशातच जागतिक आरोग्य संघटनेने धोक्याचा इशारा दिला आहे.

गेली दोन वर्षे पाठशिवणीचा खेळ खेळणारा कोरोना पुन्हा एकदा नवा अवतार घेऊन आला आहे. डेल्टा आणि ओमायक्रॉन या दोघांपासून डेल्टाक्रॉन या नव्या व्हेरिएंटची निर्मित्ती झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार काही युरोपीय देश फ्रान्स, नेदरलँड्स आणि डेन्मार्कमध्ये या नव्या डेल्टाक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हा व्हेरियंट सहजपणे फैलावतो, शिवाय याची लागण झाल्यानंतर एक व्यक्ती, एकाच वेळी दोन व्हेरिएंटने संक्रमित होऊ शकते असेही म्हटले जात आहे. अद्याप यावर संशोधन सुरू असल्याने इतक्यात निष्कर्ष व अनुमान काढता येणार नाही, पण कोरोनाने काही देशांमध्ये धुमाकूळ घातलाय हे मात्र नक्की. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने मानवाचे जीणे हराम केले आहे. सर्वप्रथम 2020मध्ये उत्पत्ती झालेल्या कोरोनाने बघता बघता संपूर्ण जग आपल्या कवेत घेतले आणि होत्याचे नव्हते केले. मग दुसरी लाट आली. तिने तर कहरच केला. स्वाभाविकपणे आपल्या देशालाही याची झळ बसली, परंतु इतर बलाढ्य देशांच्या तुलनेत आपल्याला कमी फटका बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात झालेल्या लसीकरणामुळे तिसरी लाट थोपवण्यात आपल्याला यश आले. यानंतर सर्व व्यवहार सुरळीत होऊन जीवन पूर्वपदावर आलेले असताना चीन तसेच इतर देशांत कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. आता जे आकडे समोर येत आहेत ते फक्त हीमनगाचे टोक आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. अर्थात, याआधीही कोरोनाचा वारंवार संसर्ग झालेला असून नवनव्या व्हेरिएंटने धडकी भरविली होती. प्रत्यक्षात मात्र काही व्हेरिएंटचा प्रभाव तेवढा जाणवला नव्हता जेवढी भीती निर्माण केली गेली होती. असे असले तरी पूर्वानुभव बघता कोरोनाला कुणालाही हलक्यात घेता येणार नाही. कोरोनाविषयक नियमांचे पालन जसे की मास्क बांधणे, सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर करणे या गोष्टी आपल्याला पाळाव्याच लागणार आहेत. आपण बघतो की कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यावर नियमांचे काटेकोर पालन केले जाते. याउलट कोरोना रुग्णांची संख्या घटू लागली की मात्र नियम सर्रास पायदळी तुडविले जातात. हे योग्य नाही. बेफिकीरपणा, अतिउत्साह, नसते धाडस कुठल्याही संकटास कारणीभूत ठरतात. इथे तर कोरोनारूपी शत्रू साध्या डोळ्यांना न दिसणारा आणि वेगाने पसरवणारा संसर्गजन्य आहे. त्यामुळे त्याचे इतक्यात उच्चाटन होणार नाही असे दिसते, परंतु सतर्क राहून, योग्य काळजी घेऊन आपण त्याला बर्‍याच अंशी थोपवू शकतो. आपण ते याआधी करूनही दाखविले आहे. अशाच प्रकारे भविष्यातदेखील आपल्याला स्वत:सह कुटुंबाच्या तसेच समाजाच्या पर्यायाने देशाच्या व जगाच्या सुरक्षेसाठी सावध पावले टाकून मार्गक्रमण करायचे आहे. म्हणजे सर्वांचाच प्रवास सुकर होईल. तेव्हा नियम पाळा आणि संसर्ग टाळा!

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply