Breaking News

खोटे सोने तारणातून कामोठ्यात बँकेला 34.56 लाखांचा गंडा

पनवेल : वार्ताहर

कामोठे येथील दि सह्याद्री सहकारी बँकेमध्ये पाच ग्राहकांनी एक किलो 199 ग्रॅम वजनाचे बनावट सोने तारण ठेवत बँकेकडून एकूण 34 लाख 56 हजार रुपयांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

सोन्याचे मुल्यांकन करणार्‍या बँकेच्या अधिकृत सोनारासोबत संगनमत करून या सर्वांनी फसवणूक केली आहे. त्यामुळे कामोठे पोलिसांनी बँकेच्या मुख्य कार्यकरी अधिकार्‍यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाच ग्राहकांसह सोन्याचे मुल्यांकन करणारा सोनार तसेच बँकेचा तत्कालीन व्यवस्थापक या सर्वांविरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.

कामोठे येथील दि सह्याद्री सहकारी बँकेमार्फत गोल्ड लोनसह विविध प्रकारची कर्ज दिले जात असून गोल्ड लोनसाठी येणार्‍या कर्जदारांच्या सोन्याचे मुल्यांकन आणि तपासणी अरविंद अमृते नामक सोनार करून देत होता. त्यानुसार बँकेचे व्यवस्थापक ग्राहकांना सोने तारण कर्ज मंजूर करत होते. बँकेतील खातेदार असलेली मिनाक्षी भोईटे या महिलेने 2018 मध्ये 299 ग्रॅम 650 मिलीग्रॅम वजनाचे सोने तारण ठेवून बँकेकडून नऊ लाख 90 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते, मात्र ही महिला कर्जाची रक्कम भरत नसल्याने बँकेच्या अधिकार्‍यांनी भोईटे हिने तारण ठेवलेल्या सोन्याचे दुसर्‍या सोनाराकडून तपासणी केली असता, ते बनावट असल्याचे आढळून आले. त्यानंतर अरविंद अमृते याने सोन्याचे मुल्यांकन केलेल्या आणि कर्ज भरत नसलेल्या खातेदारांची माहिती काढली. ग्राहकांनी तारण ठेवलेल्या सोन्याची दुसर्‍या सोनाराकडून तपासणी करून घेतली असता ते सोनेदेखील बनावट असल्याचे आढळून आले. अशा पध्दतीने पाच ग्राहकांनी बँकेच्या अधिकृत सोनारासोबत संगनमत करून बँकेत एक किलो 199 ग्रॅम 400 मिलीग्रॅम बनावट सोने तारण ठेवून त्याबदल्यात एकूण 34 लाख 56 हजार रुपयांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केली. त्यामुळे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश कोरडे यांनी सर्वांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, मिनाक्षी भोईटे, शफी अजीम पटेल, शफी पटेल याची पत्नी शगुप्ता पटेल तसेच वैभव रमाकांत गिरधर त्याचप्रमाणे सचिन रमेश पगडे या सर्वांनी बँकेकडून कर्ज घेतल्याचे आढळून आले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply